खेड, विशेष प्रतिनिधी :– खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील आवाशीनजीकच्या नाल्यात टँकरमधून घातक रसायन ओतल्याप्रकरणी योजना इंडस्ट्रीज व वनविड या दोन कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश कोल्हापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने दिले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर असगणी ते लवेल गावांच्या मध्ये घातक रसायन उघड्यावर ओतण्याचे प्रकार वाढीस लागले होते. या बाबत ग्रामस्थ सातत्याने तक्रारी करीत होते. अखेर ग्रामस्थांनीच आवाशीनजीकच्या नाल्यात घातक रसायन ओतणारे २ टँकर रंगेहाथ पकडले. टँकर चालकांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हे दोन्ही टँकर योजना इंडस्ट्रीज व वनविड कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याबाबतचा प्रस्ताव चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवला होता. त्यानुसार महावितरणकडून दोन्ही कंपन्यांचा वीजपुरवठा बंद केला असून एमआयडीसी कार्यालयाकडून पाणीपुरवठाही बंद केल्याची माहिती चिपळूण येथील प्रदूषण मंडळ उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिली.