मुंबई, (निसार अली) : आरेतील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह असा लॉंग मार्च आज सकाळी पर्यावरणप्रेमींनी काढला. 500 हून अधिक नागरिक यावेळी सहभागी झाले होते. जंगलातील संभाव्य वृक्ष तोड थांबवा अन्यथा चिपको आंदोलन करू, असा इशारा पर्यावरणप्रेमींकडून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला देण्यात आला.
मेट्रो कारशेडसाठी तब्बल 2700 वृक्ष तोडली जाणार आहेत. या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. लॉंग मार्चदरम्यान सेव्ह आरेच्या घोषणा देण्यात आल्या. कारशेडसाठी दुसरी जागा पहा, अशीही मागणी करण्यात आली.
प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असल्यामूळे पर्यावरणप्रेमी संंतप्त झाले आहेत. आमचा या कारशेडला विरोध आहे. हे कारशेड दुसऱ्या जागी व्हावे अशी आम्ही मागणी करत आहोत. प्रशासनाने पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर चिपको आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे आयोजकांनी सांगितले.