(सदर लेख ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी लिहिला असून दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध झाला आहे. लेखकाच्या परवानगीने लेख प्रकाशित
मुंबईची निर्मिती सात बेटांना एकत्र करून झाली आहे आणि नंतर सालसेट म्हणजे साष्टी बेट मुंबईला जोडण्यात आलं. त्यामुळे शहर व उपनगरं एकमेकांना जोडली गेली, हे सर्वांना माहीत आहे. या सात अधिक एक अशा आठ बेटांशिवाय घारापुरी, बुचर, अर्नाळा, ऑयस्टर, क्रॉस, गल, धारावी, प्राँग्ज, मढ, मार्वे, वेसावे, मुर्ढे, मिडल ग्राऊंड, राई, तुर्भे ही बेटंही मुंबईचा भाग आहेत. जुहू हेही पूर्वी वेगळं बेट होतं. या वा त्यातील काही बेटांविषयी आपण थोडं फार ऐकलेलं वा वाचलेलं असेल. पण मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंबू नावाचं असं एक बेट आहे, ते फारसं कोणाला माहीत नाही.
अंबू बेट जेमतेम एक किलोमीटर आकाराचं आहे. ते संपूर्ण फिरायला फार तर एक तास लागतो. अनेक मच्छिमार रोज त्या बेटावर जातात आणि तेथून परत येतात. तिथं राहत मात्र नाहीत. हे बेट मालाड भागात म्हणता येईल, पण ते जवळ आहे मढ व वेसावेपासून अंबू बेटावर दोन धर्मांची प्रार्थनास्थळं आहेत आणि एक दर्गाही आहे.
तिथं आपल्यापैकी बहुधा कोणीच गेलं नसेल, कारण त्या बेटाची माहितीच मुंबईकरांना नाही. मुंबईत लोकांची इतकी गर्दी, दाटीवाटी झाली असली तरी या बेटावर अजिबात लोकवस्ती नाही. एका प्रकारे हे निर्जन बेटच आहे.
बेट निर्जन म्हणण्याचं कारण म्हणजे तिथं कायमस्वरूपी कोणी राहत नाही. पण मासळी सुकवण्यासाठी अनेक मच्छिमार तिथं बहुधा रोज जातात. तसंच मासेमारीसाठी लागणारी जाळी बनवणारे कोकणी मच्छिमार तिथं त्या कामासाठी जातात. त्यातील बरेच मुस्लिम मच्छिमार आहेत. इतर स्थानिक कोळी त्यांना डाल्टी म्हणतात. त्याचं कारण व अर्थ काय, कोणास ठाऊक.
कोळी समाजात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन लोक आहेत. त्यामुळे अंबू बेटावर अंबवा मातेचं छोटं मंदिर आहे, एक लहान चर्च असून त्यात वेलांकणी माता (मदर मेरी) ची मूर्ती आहे आणि हजरत सय्यद निजामुद्दीन हुसेनी शाह बगदादी यांचा दर्गा आहे. जे मच्छिमार या बेटावर मासळी सुकवायला किंवा जाळी बनवायला जातात ते मंदिर वा चर्चमध्ये प्रार्थना करतात किंवा दर्गावर चादर चढवतात. या अंबू बेटावर पोर्तुगीजकालीन संरक्षणासाठी बुरुज आहे. समुद्रातील चाचे वा शत्रूने हल्ला केल्यास त्यातून गोळीबार किंवा तोफांचा मारा करता येईल, अशी ती जुनी व्यवस्था आहे. जवळच एक जुनं दीपगृहही आहे.
मालाडच्या मढ बेटावरून भरतीच्या वेळी तिथं बोटीने जाता येतं. वेसाव्याहून मढ व तिथून अंबू बेट असा प्रवासही शक्य आहे. जेट्टीपासून दर्गा पक्का रस्ता आहे. पुढील रस्ता कच्चा. तिथं वस्ती नसण्याचं मुख्य कारण म्हणजे पाण्याची सोय नाही. इतरही कोणत्याच नागरी सुविधा नाहीत. दर्ग्याचा उरूस असतो, तेव्हा असंख्य लोक तिथं येतात. त्यावेळी खाद्यपदार्थ, पाणी आदींचे स्टॉल लावले जातात. मात्र मढहून प्लास्टिकच्या कॅनमधून बोटीने पाणी आणावं लागतं. किंवा बाटल्यात भरून. बाटलीबंद पाणीही मढ बेटावरच मिळतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी अंबू बेट मढवर अवलंबून आहे.
या बेटावर जाणं सोपं नाही. मात्र वेसावेहून मढ व अंबू बेट असा हेरिटेज वॉक आयोजित करणारे काही जण वेसावे गावामध्ये आहेत. त्यांच्यामार्फत अंबू बेटावर जाणं उत्तम.