रत्नागिरी : लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळावं, यासाठी आम्ही आग्रही असून तशी मागणी पटलावर ठेवली असल्याचं शिवसेना खासदार तथा शिवसेना सचिव यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आज रत्नागिरी तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायतिच्या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. पण एनडीएतील घटक पक्षांना सांभाळून घेताना भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच लोकसभा उपाध्यक्षपदासाठी शिवसेना अजूनही आग्रही असल्यााचं पहायला मिळत आहे. लोकसभेचे हे उपाध्यक्षपद जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काॅग्रेसला देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु आहेत. याची कुणकुण लागल्याने शिवसेना सचिवांनी या प्रश्नावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. एनडीएमधला दुसऱ्या क्रमांकाचा शिवसेना पक्ष आहे. त्यामुळे लोकसभा उपाध्यक्षपद हे शिवसेना पक्षाला मिळावे अशी मागणी आम्ही केलीय आणि अशी अधिकृत मागणी आम्ही पटलावर ठेवली आहे. दरम्यान हे पद वायएसआरला देण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत, याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली. पण आम्ही या पदासाठी आग्रही असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.