रत्नागिरी : लोकसभा निवडणुकिसाठी भाजपने कोकणात जोरदार तयारी सुरु केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जबाबदारी आपल्यावर आहे. कमळ निशाणीचा संसद सदस्यच लोकसभेत जाईल. निवडणुकी सोबतच कोकणात शत् प्रतिशत भाजपा असेल, असे प्रतिपादन मतदार संघ प्रभारी, आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकार्यांची बैठक गुरुवारी भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर आ. लाड यांनी पत्रकार परिषेदेत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उपायोजना सुरु करण्यात आल्या आहेत.सोशल मिडिया प्रमुख, महिला संघटक, बुथ कमिटी मेंबर,युवा सेल प्रमुख , शक्ती प्रमुख आदीच्या नियुकत्या येत्या काहीी दिवसात केल्या जातील. त्या-त्या समित्या त्यांच्या पद्धतीने कामाला सुरुवात करणार आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी-वाडीवर पोहचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
केंद्र, राज्य सरकारने गेल्या चार वर्षात केलेल्या विविध विकास कामांसह वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती गावांसह वाडीवर पोहचविण्यात भाजपला यश येईल असा विश्वास आ.लाड यांनी व्यक्त केला आहे. तसेच धरणे,कर्ज माफी, बंधारे, शैक्षणिक विकास,मेट्रो, ग्रामपंचायत ऑनलाईन, वैयक्तीक लाभाच्या योजना राबविल्या आहेत. त्याचा फायदा या निवडणुकीत होणार असल्याचे आ.लाड यांनी सांगितले.
मुंबई गोवा महामार्गाला वाजपेयींचे नाव देण्याचा भाजपचा ठराव
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला भाजपा सरकारने गती दिली असून २०१९ पर्यंत एका बाजूचा रस्ता पुर्ण होईल. या रस्त्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव दोन्ही जिल्हयातील भाजपा कमिटीने केला आहे. तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे आ. लाड म्हणाले