
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असताना शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्यासाठी जिल्हाप्रमुख राहुल पंडित जिल्हाधिकारी कार्यालयातून सोमवारी चार अर्ज घेतले आहेत. आम्हाला आत्मविश्वास आहे या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारी किरण सामंत यांनाच मिळेल असा दावा श्री.राहुल पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमार्फत विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. परंतु महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. असे असले तरीही भाजपामार्फत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. आपणच उमेदवार असल्याचा दावा ना.राणे यांनी सिंधुदुर्गातील भाषणांमध्ये केला होता. तर शिवसेनेला तिकीट मिळावे यासाठी मंत्री उदय सामंत, इच्छुक उमेदवार किरण सामंत हे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाण मांडून आहेत. परंतु अद्यापपर्यंत ना.फडणवीस यांनी कोणताच निर्णय घेतला नाही.
ना.नारायण राणे यांनी स्वतःसाठी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यानंतर सोमवारी किरण सामंत यांच्यासाठी राहुल पंडित यांनी चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.