बीड : करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. परंतु पुणे, कोल्हापूर, सांगली, जालना अशा काही जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे तेथे ऊसतोड कामगार हजारोच्या संख्येने काम करीत आहेत. कुठल्याही प्रकारची वैयक्तिक सुरक्षा साधने त्यांना पुरविण्यात आलेले नाहीत. वैयक्तिक सुरक्षा साधने नसल्याने हा आजार त्यांना होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिक सुरक्षा साधने पुरविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र ऊसतोड व वाहतूक कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष व सीटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी केली आहे.
सदर ऊसतोड कामगार कुटुंबे साखर कारखान्यावर येतात व वृद्ध माणसे व त्यांची मुले गावी ठेवलेली असतात. लहान मुले असल्यास आश्रमशाळांमध्ये असतात. परंतु आता शाळा बंद असल्याने मुलेही त्यांच्या गावी आलेले आहेत. ज्यांच्या कुटुंबात वडीलधारी मंडळी नाहीत अशा कुटुंबातील मुलांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्यांचे आई-वडील अतिवृद्ध आहेत त्यांची देखभाल करण्याची काही व्यवस्था नाही .तसेच या आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऊसतोड कामगारांबाबत महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी झालेली नाही. भोजन, निवारा आणि आरोग्याच्या सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ही ऊसतोड कामगार कुटुंबे त्यांच्या घरी असणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून साखर कारखाने बंद करणे आवश्यक आहे तसेच या कामगारांना त्यांच्या गावी विशेष परवानगी घेऊन पोहोचवणे आवश्यक आहे. तरी त्यादृष्टीने राज्यातील सर्व साखर कारखाने बंद करण्याचे आदेश द्यावेत व या कामगारांना त्यांचे गावी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच गावी गेल्यानंतर त्यांच्या विलगीकरण,उपचाराची व्यवस्था करण्यात यावी. याबाबत शासनाने त्वरित कारवाई करावी, असे कराड यांनी म्हटलं आहे.