
मुंबई : लॉक डाउन काळातही राष्ट्र सेवा दल सैनिक आपले कर्तव्य विसरला नाही. स्वस्थ न बसता संघर्ष, रचना, प्रबोधन या तिन्ही स्तरावर त्याने देशसेवेचे कार्य सुरूच ठेवले आहे.
राज्य भर सेवा दल सैनिक सर्व प्रकारचे मदत कार्य करत असून अन्न धान्य पुरवणे, रक्तदान करणे, समुपदेशन करणे, जन जागृती करणे आदि कार्य करत आहेत. संविधान कार्यशाळा चे आयोजन सिरत सातपुते आणि शरद कदम यांनी केले. या ऑनलाईन कार्यशाळेत भारतीय संविधान या विषयावर सुभाष वारे , संजय म.गो., सुरेश खोपडे, चैत्रा रेडकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
लॉक डाऊन काळात जमाव बंदी असतांना राष्ट्र सेवा दल सैनिकांनी राज्य स्तरीय ऑनलाईन शाखा सुरू केली. रोज सायंकाळी 7ते 8 या वेळेत ही शाखा व्हाट्स ऍप च्या माध्यमातून भरते. एक गीत ऐकणे, व्हिडीओ पाहून व्यायाम करणे, प्रशांत बोरावके हे रोज ऑनलाईन ओरिगामी शिकवतात.
त्यांनतर एक शॉर्ट फिल्म बघून त्यावर चर्चा केली जाते. अशा प्रकारे 1 तास शाखा भरते. या शाखेत 200 सेवा दल सैनिक राज्यभरातून सहभागी झाले आहेत. मालेगाव मध्ये ही अशी ऑनलाईन शाखा रोज 4 ते 5 या वेळेत भरते. त्याच प्रमाणे ऑनलाइन अभ्यास वर्ग झूम अँप च्या माध्यमातून अभ्यास वर्ग ही सुरू केले आहेत. आता पर्यन्त 3 वर्ग झालेत यात सुभाष वारे, श्रीकांत लक्ष्मी शंकर आणि मनीषा गुप्ते यांनी मार्गदर्शन केले. 3 मे पर्यंत हे अभ्यास वर्ग सुरू राहणार आहेत.
ऑनलाईन संस्कार शिबिर
अहमदनगर येथील शिवाजी मामा नाईकवाडी आणि भीमराज कोडम यांनी ऑनलाईन संस्कार शिबिर ही घेतले. या शिबिरात अल्लाउद्दीन शेख, विनय सावंत, नचिकेत कोळपकर यांनी संवाद साधला. या शिबिरात 45 सैनिक पालकासह सहभागी झाले होते. तसेच सेवा दल कार्यकर्त्याच्या विविध ऑनलाईन बैठका होतच आहेत.















