मुंबई : वकिली व्यवसायालाही लॉक डाऊनचा फटका बसत आहे. या क्षेत्रात असलेल्या नवख्या वकिलांचे आर्थिक हाल होत आहेत. त्यांनाही मदत व्हावी म्हणून ऍड. दीपक पाईकराव यांनी पुढाकार घेतला. एक लाख रुपये त्यांनी विक्रोळी बार असोसिएशनला दिले आहेत. या रुपयांतून पाच वर्षांपेक्षा कमी प्रॅक्टिस असलेल्या वकिलांना तीन ते पाच हजार रुपये द्यावेत, अशी विनंती पाईकराव यांनी केली आहे.
विक्रोळी दंडाधिकारी न्यायालयात अनेक नवखे वकील प्रॅक्टिस करतात. दररोज जे काम मिळते, त्यावर वकिल कुटुंब पोसतो. सध्या वकिलांकडे काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. आपल्या व्यवसायातील सहकाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे, या उद्देशाने ज्येष्ठ वकील दीपक पाईकराव यांनी एक लाख रुपयांची मदत विक्रोळी बार असोसिएशनला केली आहे. असोसिएशनमार्फत सदस्य असलेला गरजू वकिलांना प्रत्येकी तीन ते पाच हजार रुपये देण्यात येणार आहे.
सध्या वकिलांना काम नाही. महत्वाचे म्हणजे वकील असल्यामुळे कोणाकडे पैसे मागायलाही ते जाऊ शकत नाही. यात नवख्या वकिलांचे हाल होत आहेत. त्यांना मदत म्हणून एक लाखाचा निधी विक्रोळी बार असोसिएशनला दिला. मुंबईत असणाऱ्या न्यायालयात अनेक नवखे वकील काम करतात. त्यांना सध्या मदतीची गरज आहे. मुंबईचे जे बार असोसिएशन आहेत त्यांनी अशा वकिलांना मदत करावी, असे आवाहन करतो असे दीपक पाईकराव यांनी सांगितले.