नवी दिल्ली, 21 मे : चेहऱ्याला लावण्याचे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले खादी मास्क “परदेशी बाजारपेठेत” जाण्यासाठी तयार आहेत. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सर्व प्रकारच्या नॉन-मेडिकल / नॉन-सर्जिकल मास्कच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर खादी व ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) आता खादी कॉटन आणि खादी सिल्कचे फेस मास्क परदेशात निर्यात करण्याची शक्यता पडताळून पाहील. या संदर्भातील अधिसूचना 16 मे रोजी विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केली.
“आत्मनिर्भर भारत अभियानाच्या” पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या “स्थानिक ते जागतिक” च्या आवाहनानंतर काही दिवसांनी ही पावले उचलण्यात आली आहेत. जागतिक कोविड -19 महामारीच्या दरम्यान फेस मास्कची प्रचंड मागणी लक्षात घेता, खादी व ग्रामोद्योग आयोगाने अनुक्रमे एकावर एक दोन कापडांचे आणि एकावर एक तीन कापडांचे कॉटन आणि सिल्कचे मास्क विकसित केले आहेत, जे पुरुषांसाठी दोन रंगांमध्ये आणि स्त्रियांसाठी विविध रंगात उपलब्ध आहेत.
खादी व ग्रामोद्योग आयोगाला आत्तापर्यंत 8 लाख मास्क पुरविण्याचे कंत्राट मिळाले आहे आणि लॉकडाऊन कालावधीत यापूर्वीच 6 लाखाहून अधिक मास्क पुरविण्यात आले आहेत. केव्हीआयसीला राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, केंद्र सरकारची मंत्रालये, जम्मू-कश्मीर सरकार कडून आणि सामान्य लोकांच्या ईमेलच्या माध्यमातून मास्कची मागणी प्राप्त झाली. देशभरातील खादी संस्थांनी विक्री व्यतिरिक्त 7.5 लाखाहून अधिक खादी मास्कचे मोफत वाटप जिल्हा प्राधिकरणांना केले आहे.
गेल्या काही वर्षात खादीच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झालेल्या दुबई, अमेरिका, मॉरिशस आणि बऱ्याच युरोपियन आणि मध्य पूर्व देशांमध्ये खादी चे मास्क पुरवण्याची खादी व ग्रामोद्योग आयोगाची योजना आहे. भारतीय दूतावासांमार्फत या देशांमध्ये खादीचे मास्क विकण्याची केव्हीआयसीची योजना आहे.
केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले की खादी मास्कची निर्यात हे “स्थानिक ते जागतिक” चे योग्य उदाहरण आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर खादीचे कापड आणि इतर खादी उत्पादनांची लोकप्रियता अलिकडच्या वर्षांत जगभरात बरीच वाढली आहे. खादी मास्कच्या निर्यातीमुळे उत्पादनात वाढ होईल आणि शेवटी कारागीरांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होईल, असे सक्सेना म्हणाले. “चेहऱ्याला लावायचे मास्क हे कोरोना साथीचा सामना करण्याचे सर्वात प्रभावी अस्त्र आहे. दोन थरांच्या खादी कापडापासून तयार केलेले हे मास्क मागणीची गुणवत्ता आणि प्रमाण कायम राखण्याबरोबरच स्वस्त असून श्वास घ्यायला सुसह्य, धुण्यायोग्य, पुन्हा वापरता येण्यासारखे आणि जैव-विघटनशील आहेत असेही सक्सेना यांनी सांगितले.
हे मास्क तयार करण्यासाठी केव्हीआयसी विशेषत: दोन थरांचे खादी कापड वापरत आहे कारण यामुळे आतून आर्द्रता टिकून राहते आणि हवा जाण्यासाठी सोपा मार्ग उपलब्ध होतो. हाताने शिवलेल्या आणि हाताने विणलेल्या सूती आणि रेशमी कापडामुळे हे मास्क अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कॉटन एक यांत्रिक अडथळा म्हणून कार्य करते तर रेशीम इलेक्ट्रोस्टॅटिक अडथळा आहे.