
मुंबई : राज्यात 2001 ते 2009 पर्यंत थकित असलेल्या खातेदारांना जे सन 2008 च्या कर्जमाफी योजनेत वंचित राहिले आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभ देण्यात येईल. 2016 – 2017 मधील जे थकित खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.राज्यातील शेतकरी, कष्टकरी व आदिवासी यांच्या संघटनांतर्फे आयोजित मुंबईतील मोर्चाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. त्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यातील शेतकरी, कष्टकरी व आदिवासी यांच्या संघटनांनी शासनास निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मागण्यांबाबत मंत्र्यांची एक समिती गठीत करण्यात आली. संघटनांच्या शिष्टमंडळासोबत समितीचे सदस्य असलेले मंत्री, विरोधी पक्षातील नेते व वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये वनहक्क कायद्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने, या अंतर्गत प्रलंबित असलेले सर्व दावे, अपिले यांचा सहा महिन्यात जलदगतीने निपटारा करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष ताबा क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र मिळाल्याची बाब असल्यास, त्याअनुषंगाने मोजणी करुन अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्य करून अधिनियम 2006 अन्वये पात्र ठरणारे (कमाल 4 हेक्टरपर्यंत) क्षेत्र देण्यात येईल. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. नारपार, दमणगंगा, वाघ व पिंजाळ या नदीखोऱ्यातील अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडविण्यात येऊन गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळविण्यासंदर्भात प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल विकास अभिकरणाकडून तयार करण्यात आला आहे. या अनुषंगाने करावयाच्या सामंजस्य कराराचा मसुदा दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी केंद्र शासनास सादर करण्यात आला आहे. सदर करारानुसार, या खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी महाराष्ट्रात अडविण्यात येऊन त्याचा वापर करण्यात येईल. हा प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे.
शेतकरी कर्जमाफीविषयी माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले, आजपर्यंत राज्यात 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांना मान्यता देऊन बँकांना निधीचे प्राधिकार देण्यात आले आहेत. 35 लाख 51 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. 2001 ते 2009 पर्यंत थकित असलेल्या खातेदारांना जे सन 2008 च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्या खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभ देण्यात येईल. 2016 – 2017 मधील जे थकित खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल. कुटुंबातील पती अथवा पत्नी अथवा दोघेही व अज्ञान मुले यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. कुटुंबातील प्रत्येकी व्यक्ती स्वतंत्र अर्जदार समजण्यात यावा, अशी एक मागणी पुढे आली असून त्यावर, प्रत्येक व्यक्तीवर वित्तीय भार किती आहे, याचा विचार करुनच निर्णय घेता येईल. याबाबत समिती गठित करुन त्यासंदर्भात दीड महिन्यात निर्णय घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीकरिता एक समिती गठीत करण्यात येईल. त्यामध्ये मंत्री तथा आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. पीक कर्जासोबत मुदत कर्जाचाही समावेश करण्यात आला आहे. या मुदत कर्जामध्ये शेती, इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठीच्या दीड लाखापर्यंतच्या कर्जाचासुद्धा समावेश करण्यात येईल. जे कर्जदार शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल करु शकले नाहीत, त्यांना 31 मार्च 2018 पर्यंत नव्याने अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.













