नागपूर : लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक घटकाला चेक अँड बॅलन्स असणारी देशाची लोकशाहीची रचना सूंदर आहे. प्रशासकीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ही व्यवस्था सुरू असून ती रुजविण्यासाठी लोकशाहीचे सेवक म्हणून तरुणांनी या व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.४८ व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, संसदीय मंडळाचे खजिनदार आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.नागपुरात होणारे हे चौथे पावसाळी अधिवेशन असून याची नोंद इतिहासात होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगातील इतर देशांपेक्षा आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था ही वेगळी आहे. संसदीय प्रणाली, प्रशासकीय प्रणाली व न्याय व्यवस्था या लोकशाहीच्या तीनही स्तंभांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था यामध्ये केली आहे. लोकशाही व्यवस्थेत या सर्व घटकांना अमर्याद अधिकार दिले असले, तरी प्रत्येक अमर्याद अधिकाराची मर्यादा संविधानाने ठरवली आहे. असे हे आगळे वेगळे संविधान दिल्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले पाहिजेत. अशा या समृद्ध लोकशाहीसाठी ती जाणणारे, त्यामध्ये रुची असणारे व त्याची दिशा ठरविणाऱ्या तरुणांचा सहभाग आवश्यक आहे.समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज पोहोचविण्यासाठी विधिमंडळाच्या सभागृहात प्रत्येक घटकाचा प्रतिनिधी असतो. सामान्य माणसांच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधीला संवेदनशील रहावे लागते. अन्यथा विधिमंडळात त्याला उत्तर द्यावे लागते. विविध संसदीय आयुधांचा वापर करून सभागृहात सामान्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडली जाते. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने देशात आपला दर्जा, वेगळेपण राखले आहे, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.