मुंबई : राज्यातील सर्व विधी अभ्यासक्रमांसाठी प्रति तुकडी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. आता सन २०१७-१८पासून राज्यातील सर्व विधी पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रति तुकडी ६० विद्यार्थी अशी राहणार आहे.
महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम,२०१५ अंतर्गत ३ आणि ५ वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार सन २०१६-१७ साठी सदर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यामार्फत सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेने राबविण्यात आली आहे. सदर प्रवेश प्रक्रिया राबविताना विधी महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेची नोंदणी करताना, काही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ८० विद्यार्थी प्रति तुकडी तर काही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ६० विद्यार्थी प्रति तुकडी अशी नोंदविण्यात आली होती. सदर प्रवेश क्षमतेच्या तफावतीमुळे सन २०१६-१७ च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडचणी निर्माण झाल्याने यापुढे विधी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रति तुकडी विद्यार्थी प्रवेश क्षमतेमध्ये एकसमानता आणण्यात आली आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201705171554341508 असा आहे.