लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित शॉपिंग अॅण्ड फुड फेस्टिवलचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
रत्नागिरीः लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या वतीने सामाजिक कार्यासाठी निधी संकलनासाठी आयोजित शॉपिंग अॅण्ड फुड फेस्टिवलचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडले.
या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, खजिनदार अमेय वीरकर, सचिव विशाल ढोकळे, शॉपिंग बझ अध्यक्ष ओंकार फडके यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य, स्टॉल धारक आणि ग्राहक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालय, माळनाका येथे 2 ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत हा फेस्टिवल सकाळी 10 ते रात्रौ 10 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यातून मिळणारा सर्व निधी लायन्स क्लब ट्रस्टच्या आय हॉस्पिटलच्या विस्तारासाठी तसेच नवीन सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे. या फेस्टिवलचे उद्दिष्ट केवळ निधी उभारणीपुरते मर्यादित नसून, स्थानिक व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देणे हा असल्याचे लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी यांनी सांगितले. या शॉपिंग अॅण्ड फुड फेस्टिवलला जास्तीत जास्त ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.