रत्नागिरी : कोकणातील शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेणे गरजेच आहे. जेव्हा एखादे शेतमालाचे आवक बाजारात मोठया प्रमाणात असते आणि त्याची मागणी कमी असते अशा वेळी त्याचा बाजारातील भाव उतरतो आणि या परिस्थितीचा व्यापारी गैरफायदा घेऊन शेतकऱ्याकडून कमी दरात माल उचलतो. यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेणे गरजेच आहे. या योजनेंचा लाभ घेऊन शेतमालाचा दोन ते तीन महिने विक्री न केल्यास शेतकऱ्यांना दीड पट भाव मिळून येथील शेतकरी आर्थिक दृष्टया समृध्द होतील असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
शांतीनगर, ता.जि. रत्नागिरी येथे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या लिलावगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, आमदार हुस्नबानू खलिपे, माजी आमदार बाळ माने, राजाभाऊ लिमये , समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, नाचणे गावाच्या सरंपच जयाताई घोसाळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे मधुकर दळवी, कृषि उत्पन्न बाजारसमितीचे माजी संचालक प्रभाकर वडके, राजापराम रहाटे, सुधाकर सुर्वे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे श्री. गांगण, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, जिल्हा उपनिबंधक बकुळा माळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.,
ते पुढे म्हणाले रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून यावर्षी ७३ लाख रुपये शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेंतर्गत देण्यात आले आहेत. पुढील वर्षी या योजनेंतर्गत काजू, सुपारी यासारख्या उत्पादनांचा आंतर्भाव केल्यास १० कोटी रुपयांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना देणे शक्य होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सहकार मंत्री म्हणाले कोकणात मेाठया प्रमाणात हापूस आंबा उत्पादन होते, हापूस आंब्यांचा व्यापार संपूर्ण देशात वाढविण्यासाठी व येथील स्थानिक स्तरावरील आंब्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीचा लिलावगृह महत्वाचा असणार आहे. सर्वत्र हापूस आंब्याची मार्केटींग होण आवश्यक आहे. याआधी आंबा लिलाव प्रक्रीया रत्नागिरी येथे उपलब्ध नसल्याने आंबा उत्पादक शेतकरी आपला माल बाहेर पाठवत होते. त्यामुळे आंब्याचा लिलाव बाहेरील व्यापाऱ्यांमार्फत रत्नागिरी येथे करण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. आंबा बागायतदारांनाबाबत जे काही प्रश्न प्रलंबित आहे ते आपण मार्गी लावू आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करु. पणन विभागाचा मंत्री म्हणून येथील आंबा शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण कटिबध्द आहोत.
ते पुढे म्हणाले शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांने उत्पादन केलेले मालाचा त्याला स्वत:ला किंमत ठरविता यावी यासाठी महापालिकाच्या कार्यक्षेत्रात शहराच्या ठिकाणी मैदान भाडेने उपलब्ध्ा करुन देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यालाही त्यांनी उत्पादन केलेल्या मालाचा चांगला भाव मिळतो तसेच ग्राहकालाही ताजे माल माफक दरात खरेदी करता येईल. यासाठी कोकणातील प्रत्येक शेतकऱ्यांना तसेच आंबा बागायतदारांना प्रशिक्षण देण्यात यावे. ज्या ज्या ठिकाणी मैदाने आवश्यक आहे त्या ठिकाणी ती उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच येथील आंबा बागायतीदारांना समृध्द करण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती व पणन विभागाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असेही ते म्हणाले.