नवी दिल्ली : 5 एप्रिलला रात्री 9 वाजता भारतमातेचे स्मरण करा. विजेचे दिवे बंद करून 9 मिनिटांसाठी दिवा पेटवा, प्रकाशाचे तेज चारी दिशांना पसरवा आणि अंधकारमय कोरोना संकटाला पराभूत करा, असे संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले.
ते म्हणाले, कोरोना या जागतिक महामारी विरोधातील देशव्यापी लॉकडाउनला आज 9 दिवस पूर्ण होत आहेत. या काळात तुम्ही सर्वानी ज्याप्रकारे शिस्त आणि सेवा भाव या दोन्हींचे दर्शन घडवले आहे ते अभूतपूर्व आहे. सरकार, प्रशासन आणि जनता जनार्दन यांनी एकत्रितपणे ही परिस्थिती उत्तम प्रकारे सांभाळण्याचे भरपूर प्रयत्न केले आहेत. रविवार 22 मार्च ,रोजी कोरोना विरोधात लढाई लढणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो. आज अनेक देश त्याचे अनुकरण करत आहेत. जनता कर्फ्यू असेल, घंटानाद असेल, टाळ्या-थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम असेल, यातून या आव्हानात्मक काळात देशाला या सामूहिक सामर्थ्याची जाणीव करून दिली. देश एकत्र येऊन कोरोना विरोधात लढाई लढू शकतो ही भावना दिसून आली.आता लॉकडाउनच्या काळात देशाची , तुम्हा सर्वांची ही एकजुटता सफल होत असल्याचे दिसून येत आहे. आज जेव्हा देशातील कोट्यवधी लोक घरामध्ये आहेत तेव्हा कुणालाही असे वाटू शकते की तो एकटा काय करेल. काही लोक असाही विचार करत असतील की एवढी मोठी लढाई लोक येथे एकटे कसे काय लढू शकतील? हे प्रश्न देखील मनात येत असतील की- आणखी किती दिवस असे काढावे लागणार आहेत?
हा लॉकडाउनचा काळ जरूर आहे , आपण आपापल्या घरांमध्ये आहोत, मात्र आपल्यापैकी कुणीही एकटे नाही. 130 कोटी देशवासीयांची सामूहिक ताकद प्रत्येक व्यक्तीच्या बरोबर आहे, प्रत्येक व्यक्तीचे सामर्थ्य आहे.वेळोवेळी देशवासियांच्या या सामूहिक सामर्थ्याचे विराट दर्शन, भव्यता आणि दिव्यतेची अनुभूती घेणे आवश्यक आहे.आपल्याकडे मानले जाते की जनता जनार्दन, ईश्वराचेच रूप असते. म्हणूनच देश जेव्हा एवढी मोठी लढाई लढत आहे, तेव्हा या लढाईत जनतारूपी महाशक्तीचा वारंवार साक्षात्कार करत राहायला हवा. हा साक्षात्कार, आपल्याला मनोधैर्य देतो, उद्दिष्ट देतो, ते साध्य करण्यासाठी ऊर्जा देतो, आपला मार्ग अधिक स्पष्ट करतो. कोरोना महामारीमुळे पसरलेल्या या अंधारातून आपल्याला निरंतर प्रकाशाकडे जायचे आहे. जे या कोरोना संकटामुळे सर्वात जास्त प्रभावित आहेत , आपले गरीब बंधू भगिनी , त्यांना निराशेकडून आशेकडे घेऊन जायचे आहे. या कोरोना संकटामुळे जो अंधार आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे ती संपवून आपल्याला प्रकाश आणि निश्चिततेच्या दिशेने वाटचाल करायची आहे. या अंधकारमय कोरोना संकटाला पराभूत करण्यासाठी आपल्याला प्रकाशाचे तेज चारी दिशांना पसरवायचे आहे.
आणि यासाठी येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी आपण सर्वानी मिळून कोरोना संकटाच्या अंधाराला आव्हान द्यायचे आहे. , त्याला प्रकाशाच्या सामर्थ्याचा परिचय करून द्यायचा आहे. या 5 एप्रिलला आपल्यला 130 कोटी देशवासियांच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे.
130 कोटी देशवासियांच्या महासंकल्पाला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे.5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता मला तुम्हा सर्वांची 9 मिनिटे हवी आहेत. लक्षपूर्वक ऐका , 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील सर्व विजेचे दिवे बंद करून घराच्या दरवाज्यात किंवा बाल्कनीत उभे राहून 9 मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा,टॉर्च किंवा मोबाइलचा फ्लैशलाइट पेटवा.
मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाइलचा फ्लैशलाइट, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी लावा. आणि त्यावेळी घरातील सर्व दिवे बंद केले, चारी दिशांना जेव्हा प्रत्येक व्यक्ती एक-एक दिवा पेटवेल तेव्हा प्रकाशाच्या त्या महाशक्तीची जाणीव होईल, ज्यातून आपण एकाच ध्येयाने लढत आहोत ही भावना दिसून येईल.
त्या प्रकाशात, त्या उजेडात , आपण आपल्या मनात हा संकल्प करूया कि आपण एकटे नाही, कुणीही एक 130 कोटी देशबांधव एकाच संकल्पाने कृतसंकल्प आहेत.
माझी तुम्हाला एक विनंती आहे की या आयोजनाच्या वेळी कुणीही कुठेही एकत्र जमायचे नाही. रस्त्यांवर, गल्लीमध्ये किंवा नाक्यावर जायचे नाही, आपल्या घराच्या दरवाजात, बाल्कनीत उभे राहून हे करायचे आहे.सोशल डिस्टन्ससिंग अर्थात सामाजिक अंतराची लक्ष्मण रेषा कधीही ओलांडायची नाही. सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन कुठल्याही परिस्थितीत करायचे नाही.कोरोनाची साखळी तोडण्याचा हाच रामबाण उपाय आहे.म्हणूनच 5 एप्रिलला रात्री 9 वाजता काही क्षण एकांतात बसून भारतमातेचे स्मरण करा,130 कोटी देशबांधवांच्या चेहऱ्याची कल्पना करा, 130 कोटी देशवासीयांची या सामूहिकतेचे , या महाशक्तीची अनुभूती घ्या. ती आपल्याला या संकटाच्या काळात लढण्याचे बळ देईल आणि जिंकण्याचा आत्मविश्वास देखील. आपल्याकडे असे म्हटले जाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
उत्साहो बलवान् आर्य, न अस्ति उत्साह परम् बलम्।
स उत्साहस्य लोकेषु, न किंचित् अपि दुर्लभम्॥
म्हणजे, आपला उत्साह,आपले मनोधैर्य यापेक्षा जगात अधिक बलवान दुसरे काही नाही.
जगात असे काही नाही जे आपण या सामर्थ्यातून मिळवू शकत नाही.
चला, एकत्र येऊन, एकजुटीने कोरोनाला हरवू या, भारताला विजयी करूया, असे आवाहन त्यांनी केले आहे.