मुंबई : वर्ष 2019 विस्ताराचे वर्ष करण्याचे आवाहन केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी बिरेंदर सिंग यांनी उद्योग क्षेत्राला केले आहे. ते आज मुंबईत ‘भारत पोलाद 2019’ प्रदर्शन आणि परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. विस्ताराचा अर्थ नव्या भागात, नव्या बाजारपेठांमध्ये, नव्या वापर क्षेत्रात आणि नव्या देशांमध्ये पोहोचणे. राष्ट्रीय पोलाद धोरणात निश्चित करण्यात आल्याप्रमाणे 2030-31 पर्यंत 300 दशलक्ष टनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येकाने वेगाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मेक इन इंडियाच्या पूर्ततेसाठी पोलाद क्षेत्रात नवतंत्रज्ञान आणि नवीनतम शोधांची गरज सिंह यांनी व्यक्त केली. तसेच हे आव्हान पोलाद क्षेत्र निश्चितच पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2014 पासून सरकारने उचललेल्या पावलांमुळे 2018-19 च्या पहिल्या नऊ महिन्यात पोलाद उत्पादनाचा विकास 4.5 टक्क्यांवर, तर पोलाद वापरात 8.4 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सरकार, पोलाद कंपन्या आणि इतर संबंधितांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पोलाद क्षेत्रात परिवर्तन शक्य झाल्याचे पोलादमंत्र्यांनी सांगितले.
वर्ष 2018 पोलाद क्षेत्राला भक्कम करणारे वर्ष होते. भारतातील पोलाद क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी देशविदेशातून गुंतवणूकदार पुढे आले, स्वयं पूर्णता आणि मेक इन इंडियाच्या दिशेने ते मोठी झेप घेणारे ठरले, असे पोलाद मंत्र्यांनी सांगितले.
2018 च्या पहिल्या 11 महिन्यात पोलाद उत्पादनात जपानला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा कच्चा पोलादाचा उत्पादक देश ठरला आहे. संशोधन आणि विकासाच्याबाबतीत SRTMI कार्यान्वित झाले असून, SAIL आणि RINL या दोन सार्वजनिक उपक्रमांनी हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम संशोधन आणि विकासावर गेल्या तीन वित्तीय वर्षात खर्च केली आहे. 86 टक्के उत्पादने गुणवत्ता नियंत्रणात आली असून, 100 टक्क्यांकडे वाटचाल सुरु आहे.
भारत पोलाद 2019 परिषदेच्या माध्यमातून भारतीय पोलाद क्षेत्राच्या विकासाच्या नव्या अध्यायाला सुरुवात होण्यास साहाय्य मिळेल. या मंचाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राकडून मिळणारी माहिती धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणीत महत्वपूर्ण ठरेल, असे ते म्हणाले.
नवे राष्ट्रीय पोलाद सुरक्षा मंडळ लवकरच स्थापन केले जाईल, असे सिंह यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
राष्ट्रीय पोलाद धोरणाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी कृती आराखड्यावर सरकार काम करत असल्याचे पोलाद सचिव बिनॉय कुमार यांनी उपस्थितांना सांगितले. आणखी 16 पोलाद उत्पादने अलिकडेच गुणवत्ता नियंत्रणाखाली आणण्यात आल्यामुळे ही संख्या 53 उत्पादनांवर पोहोचली असल्याचे, त्यांनी सांगितले.
पोलाद मंत्रालयाने ‘भारत पोलाद 2019’ प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन केले आहेत. मुंबईत 24 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन आणि परिषद सुरु राहणार आहे.