सदर लेख ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी लिहिलेला असून दै. सामनामध्ये प्रसिद्ध झाला आहे. लेखकाच्या परवानगीने येथे प्रकाशित करत आहोत.
हल्ली आईस्क्रीम म्हटलं की कप-कोनमधील थंड दुधाळ पदार्थच डोळ्यासमोर येतो. आता आईस्क्रीममध्ये इतके ब्रॅण्ड्स आणि इतक्या व्हरायटी व फ्लेवर्स म्हणजे चवी आल्या आहेत की विचारायची सोय नाही. मिरची, लिंबू आलं, आंबा, पेरू, जांभूळ, कलिंगड, केळी, स्ट्रॉबेरी, लिची अशा फळांची चव आईस्क्रीममध्ये मिळू शकते. शिवाय चॉकलेट, बेल्जीयम चॉकलेट, पिस्ता आणि ना जाणे कोणती आईसक्रीम बनतात, विकली जातात आणि खाल्लीही जातात. मोठ्या आईस्क्रीम पार्लर म्हणजे दुकानात एका कुटुंबातील चार जण वा मित्र गेले की प्रत्येकाला काही तरी वेगळं हवं असतं. काही वेळा तर मुद्दाम चार वेगळी आईस्क्रीम घेतली जातात, म्हणजे प्रत्येकाला चारहीची चव कळू शकेल. त्यात टरकिश आईस्क्रीम देण्याची पद्धतही गमतीदार. हातात कोन दिला जातो, पण त्यात आईस्क्रीम भरताना ग्राहकांना खेळवलं जातं. अशा वेळी लहान मुलं रडायला लागतात आणि मोठी माणसं अस्वस्थ होतात. पण मार्केटिंगची ही नवी आगळी पद्धत आहे मात्र मस्त. असो.
उन्हाळा सु्रू होताच आईस्क्रीमची आठवण येणं, ते खाण्याची इच्छा होणं हे स्वाभाविकच. यंदा तर उन्हाळा लवकरच सु्रू झाला आहे आणि अनेक भागात तापमान 40 अंश वा त्याहून वर गेलं आहे. अशा उन्हाळ्यात जशी घरात विजेची मागणी वाढते अगदी तशीच थंड पेय आणि आईस्क्रीमचीही मागणी खूप वाढते. घरोघरी फ्रिज आल्यानं आईस्क्रीम बनवणं खूप सोपं झालं आहे. अगदी ताज्या फळांचं आईस्क्रीमही अनेक घरात बनतं. आईस्क्रीम खाणं ही अपूर्वाई राहिलेली नाही. पण गंमत म्हणजे आपल्याकडे कडक उन्हात जितकं आईस्क्रीम खाल्लं जातं, त्याहून अधिक उन्ह उतरल्यानंतर म्हणजे संध्याकाळी ते खाल्लं जातं. मुंबईकर उन्हात लिंबू सरबत, काला खट्टा, कलिंगड सरबत, संत्री वा मोसंब्याचं ज्यूस वा ताक व लस्सी किंवा अगदी चहाही पितात, पण आईस्क्रीम संध्याकाळी. जी काही ऐश करायची ती फक्त संध्याकाळीच.
काही वर्षांपूर्वी आईस्क्रीम म्हटलं की थंडगार बर्फाची रंगीत कँडीच डोळ्यापुढे यायची आणि त्याला कँडी नव्हे, तर आईस्क्रीम वा आईसफ्रुट म्हटलं जाई. त्याला पॉप्सीकल म्हणतात, हे तर आपल्या गावीही नव्हतं. लाल, पिवळा, हिरवा, नारिंगी अशा विविध रंगांच्या आईस कँडी खूप लोकप्रिय होत्या. शाळेत असताना मधल्या सुट्टीत पाच व दहा पैशांची आईस कँडी खाल्ली जायची. उन्हाळ्यात घरावरून गाडी चालली की आईकडून पाच-दहा पैसे घेऊन कँडी विकत घ्यायची आणि ती हळूहळू चोखत राहायची. तसं करताना मध्येच त्यातील रंग वा बर्फाचा तुकडा कपड्यांवर पडला की घरी ओरडा ठरलेला. तो रंग पटकन जायचाच नाही. लिंबू, संत्री, रोज म्हणजे गुलाब असे तीन चार फ्लेवर्सच असायचे तेव्हा. मग नंतर खस, काला खट्टा, आंबा, द्राक्ष अशा चवी त्यात आल्या. तेव्हा व्हॅनिला कँडीही मिळायची. पण त्या पांढऱ्यापेक्षा रंगीत कँडी लोकप्रिय असायच्या.
गंमत म्हणजे आईस्क्रीमचा शोध एका 11 वर्षांच्या अमेरिकन मुलामुळे 1911 साली लागला. कडाक्याच्या थंडीच्या रात्रीत त्याने आपला सोड्याचा ग्लास चुकून घराबाहेर ठेवला. सकाळी त्याचा बर्फ झाला होता आणि आकार होता त्या ग्लासचा. पाण्यात वेगवेगळे रंग, साखर घालून अशी कँडी केली तर ती चांगली लागते, हे लक्षात आलं. त्यातून ज्याला आता पॉप्सीकल हे नाव पडलं ती आईसकँडी तयार झाली. आता पुन्हा तरुणांमध्ये आईस कँडी विकत घेऊन खात खात फिरायची फॅशन आली आहे. कॉलेज परिसरात आईस कँडीच्या पुन्हा गाड्या लागताना दिसत आहेत. त्यांना पाहून लहानपणच आठवतं. तेव्हा क्वालिटीची गाडी ठिकठिकाणी फिरायची. आताही ती दिसते. क्वालिटीची पॉप्सीकल खूपच मस्त आणि दाट आहेत. पूर्वीसारखा पारदर्शक व पाणीदार नाहीत. नुसतं रंगीत पाण्याचा बर्फ चोखतोय, असं अजिबात वाटत नाही. चवही अतिशय उत्तम. त्यांची किंमत 20 रुपयांपासून सु्रू होते. ते असंख्य दुकानातही मिळतात. अमूलचे पॉप्सीकालही खूप छान आहेत. त्यांची किंमत 15 रुपयांपासून सु्रू होते. अमूलचे दूध व अन्य पदार्थ खूप लोकप्रिय असले तरी त्यांचे पॉप्सीकल वा आईस कँडी तितकीशी माहीत झालेली नाही.
मुंबईत आईस्क्रीम बनवणाऱ्या अनेक मोठ्या-छोट्या कंपन्या आहेत. जवळपास 50 तरी आईस्क्रीमचे ब्रॅण्ड्स आहेत. त्यापैकी काही तर खूपच महाग. पण सर्वात स्वस्त व लोकप्रिय पॉप्सीकलचे मोजके, पण खूप छान ब्रॅण्डही मुंबईत आहेत. सायन रेल्वे कॉलनीतील बॉम्बे पॉप्सीकल कंपनी खूप प्रसिद्ध आहे. पूर्व उपनगरात आणि ठाण्यापर्यंत यांची आईस कँडी पोहोचते. त्यांची काही आईस्क्रीम्सही आहेत. तीही चांगली आहेत. त्या भागात गेलात तर अवश्य ही आईस कँडी घ्यावी. ती खाता येत नाही. लहानपणीप्रमाणे ती आताही चोखावी लागते. तसं करताना एक विशिष्ट आवाज येतो. मालाडला इनॉर्बिट मॉलच्या समोरील बाजूला लिटल लोको पॉप्समध्येही खूप छान चवीच्या आईस कँडी मिळतात. तिथं जाणारे एका वेळी दोन तीन आईस कँडी तर आरामात संपवतात. कांदिवली पूर्वेला महान प्रोटीन्स नावाच्या ठिकाणी मिळणाऱ्या आईस कँडीही खूप लोकप्रिय आणि छान आहेत.
अंधेरीला न्यू लिंक रोडवर गुजराती हॉलपाशी बेलो पॉप्स आहे. गोरेगावला मोतीलाल नगरमध्येही बेलो पॉप्सचं आहे. यांच्याकडेही अनेक चवीच्या उत्तम कँडी मिळतात. तेथील आंबा, द्राक्ष, लिंबू, गुलाब, संत्री, किवी, पेरू, अननस, काला खट्टा अशा चवीच्या आईस कँडी खूप लोकप्रिय व छान आहेत.
नवी मुंबईत वाशीच्या सेक्टर 29 मध्ये स्कुझो आईस ओ मॅजिकमधील आईस कँडीही भन्नाट. ठाण्यात चरईच्या सिल्क क्रीममध्ये पाणीपुरी, जीरा मसाला, लाईम मोजीटो, पायनॅपल मिक्स अशा अनेक चवीच्या आईस कँडी मिळतात. डोंबिवलीमध्ये पूर्वेला पोस्ट ऑफिससमोर अरुण आईस्क्रीमच्या हॅप डेली दुकानात आईस कँडी किंवा आईस बारचे अनेक प्रकार आहेत. पण तिथं जाणं झालेलं नाही. इतरत्रही स्थानिक आईस कँडीवाले असतील. प्लास्टिक पिशवीत कँडीसदृश्य मिळणाऱ्या प्रकाराचं नावही पेप्सी होतं. ते पेप्सी आईस आजही अनेक ठिकाणी मिळतात. उन्हाळ्यात मिल्की आईस्क्रीमपेक्षा पॉप्सीकल वा पेप्सी आईसचाही आस्वाद घ्यायला हवा.