रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात लेप्टो- डेंग्यू हे साथीचे आजार पसरले आहेत. लेप्टोस्पायरोसिसचे २६ तर डेंग्यूचेही रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
भात शेती आणि सांडपाण्याच्या ठिकाणी प्राण्यांच्या मलमुत्रामुळे दुषीत झालेले पाणी यामुळे पसरणारा व जिवाणुमुळे होणारा लेप्टो आजार आहे. प्राण्यांच्या मलमुत्राने दुषीत झालेल्या पाणी किंवा मातीसोबत संपर्क आल्यास हा आजार होतो. लेप्टोस्पायरोसिची लक्षणे आढळून आल्याने संशयित रूग्णांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. संशयित रूग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार २६ जणांना लेप्टो झाल्याचे समोर आले आहे. नियमित सर्वेक्षण, निदान व त्वरीत उपचार करणे यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे डेंग्यूनेही डोके वर काढले असून, जानेवारीपासून जिल्ह्यात डेंग्यूचे ३७ रूग्ण सापडले आहेत. तर लेप्टोचे २६ रूग्ण सापडले आहेत. गुहागर १, चिपळूणमध्ये २, संगमेश्वरमध्ये ७, रत्नागिरी १२, लांजा १ आणि राजापूर तालुक्यात तीन रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.