रत्नागिरी, विशेष प्रतिनिधी ः- रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघड झाली होती.
भक्षाच्या शोधात असताना बिबट्या आगरनरळ येथे राहणाऱ्या वासुदेव गोताड यांच्या शेतात लावलेल्या वायररोपमध्ये रात्रीच्या सुमारास अडकला. गावातील ग्रमस्थ सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ग्रमस्थांनी याची माहिती पोलीसपाटलांना दिल्यानंतर त्यांनी जयगड पोलीसांनी या घटनेची माहिती दिली.
जयगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांना माहिती दिली. लगड यांनी आपल्या सहकार्यांसह पिंजरा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या वायररोपमध्ये अडकल्याने कटरच्या सहाय्याने वायररोप कापून बिबट्याची सुटका करण्यात आली. सुमारे पाच वर्षाचा हा मादी बिबट्या आहे. या बिबट्याची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. बिबट्याची सुखरुप सुटका करण्यासाठी विभागीय वन अधिकारी दिपक खाडे , सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शना खाली परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी प्रियंका पंढरीनाथ लगड , वनपाल संगमेश्वर सु.आ. उपरे , म.ग.पाटील , ,सा.रं.पताडे , वनरक्षक कोले , वि.द.कुंभार ,न्हा.सि.गावडे , राहुल गुंठे , सं.म.रणधीर यांनी कार्यवाही पार पाडली.