रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याचा वावर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातही दक्षिण रत्नागिरीमध्ये मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या वर्षभरात विहिरीत, फासकीत किंवा गोठ्यात सापडलेल्या 8 बिबट्याना वाचविण्यात वनविभागाला यश आलं आहे. तर 10 बिबटे मृत सापडलेले आहेत. यामध्ये काहींचा मृत्यू नैसर्गिक, काही वाहनाच्या धडकेने तर काही शेणखईत पडून मृत झालेले आहेत.
कोकणात सध्या बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. काही वर्षात बिबट्यांची संख्या ही वाढली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे बेसुमार जंगलतोड केली जात आहे. जंगलक्षेत्र कमी झाल्यानं त्याचा परिणाम हा वन्य प्राण्यांवर दिसून येतोय. जंगलात भक्ष न मिळाल्यानं बिबटे सध्या मानवी वस्तीकडे वळताना दिसत आहेत. या भक्षाचा पाठलाग करताना अनेक बिबट्यांचा विहरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. तर काहींचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. मात्र काही बिबट्याना वाचविण्यात वनविभागाला यश आल्याची माहिती वनक्षेत्रपाल बी. आर. पाटील यांनी दिली आहे. गेल्या वर्षभराचा विचार केला तर फक्त दक्षिण रत्नागिरीतच 18 बिबटे वनविभागाला सापडले आहेत. यातल्या काही बिबट्याना वाचविण्यात यश आलं आहे. तर काही बिबटे मृत झाले आहेत. या 18 मधले सर्वाधिक बिबटे राजापूर आणि लांजा तालुक्यामध्ये सापडले आहेत.
* जानेवारीमध्ये एकूण 3 बिबटे सापडले. एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात यश आलं. तर 2 बिबटे हे मृत सापडले.
* मे महिन्यात 3 बिबटे आढळले. यातले 2 बिबटे मृतावस्थेत सापडले, तर एक बिबट्या वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर मृत पावला
* ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण 4 बिबटे सापडले. यातल्या एका फासकीत अडकलेल्या एका बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश आलं. तर तीन बिबटे हे मृत आढळले. यातला एक बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार झाला होता.
*ऑक्टोबर महिन्यात एकूण 4 बिबटे सापडले. यातले 2 बिबटे विहिरीत पडले होते, त्या दोघानाही वाचविण्यात यश आलं. तर जखमी अवस्थेत आढळलेला एक बिबट्या मृत पावला. तर दुसरा एक बिबट्या गोठ्यात मृतावस्थेत सापडला.
*नोव्हेंबर महिन्यात एकूण 4 बिबटे सापडले. हे चारही बिबटे विहिरीत पडले होते. या चारही बिबट्याना वाचविण्यात वनविभागाला यश आलं. यातले 2 बिबटे राजापूरमध्ये, एक लांजामध्ये तर एक रत्नागिरीत सापडला.