रत्नागिरी, (आरकेजी) : राजापूर तालुक्यातील पडवे गावातील नवलाई देवी मंदिराशेजारी बुधवारी एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला. मादी जातीतील बिबट्याचे वय एक वर्ष असे आहे. मादी बिबट्या मृत होऊन अंदाजे तीन ते चार दिवस लोटले होते. त्यानंतर ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. वन विभागाला ग्रामस्थांकडून याबाबत माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला असावा याचे कारण अद्याप वनखात्याकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.