
प्रातिनिधीक
रत्नागिरी, (आरकेजी) : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वृद्ध ठार झाल्याची घटना राजापूर तालुक्यात घडली. रघुनाथ गणपत नवाळे असं त्यांचे नाव आहे. देवाचे गोठणे गावातील बुरंबेवाडीत ते राहात होते.
रघुनाथ शुक्रवारी काजू गोळा करण्यासाठी काजूच्या बागेत गेले होते. खूप वेळ झाला तरी ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा काजूच्या बागेत त्यांना बोलावण्यासाठी गेला. तेव्हा, बागेतील दृश्य पाहून तो हादरला. रघुनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याला दिसले. त्यांच्या शरीरावर बिबट्याची नखे आणि दातांचे व्रण होते. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने काल सायंकाळी उशिरा त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी अनेकवेळा बिबट्याने या परिसरात बकऱ्या, गाई यांच्यावर हल्ले केल्याच्या घटना घडल्या होत्या, मात्र माणसावर हल्ला केल्याची राजापूर तालुक्यातील हि पहिलीच घटना आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण आहे.
देवाचे गोठणे परिसरात बिबट्याचा संचार सुरु होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून जंगलात पिंजराही लावण्यात आला होता. मात्र त्यामध्ये बिबट्या न सापडल्याने पिंजरा हटवण्यात आला होता. पण आता बिबट्याने थेट माणसावरच हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचे आवाहन वनविभागासमोर आहे.