रत्नागिरी : बिबट्याच्या हल्ल्यात दोन व्यक्तीसह एक गाय जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुहागर तालुक्यातील कुडली गावात बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. अशोक भागोजी पवार आणि साक्षी अविनाश पवार अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत.
गुहागर तालुक्यातील कुडली या गावातील अशोक भागोजी पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या पडवीत झोपले होते. दरम्यान मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने घरात शिरून अशोक पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अशोक पवार यांच्या हाताला बिबट्याने पंजा मारल्याने ते जखमी झाले आहेत, तर साक्षी अविनाश पवार यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला असून त्यामध्ये तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्याने त्यांच्या गोठ्यातील गायीवरही हल्ला केला असून, गाय देखील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. दरम्यान जखमी दोघांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाने लगेचच घटनास्थळी जाऊन पाहणी करत जखमींची भेट घेतली.