नवनाथ मोरे (लेखक विद्यार्थी चळवळीत सक्रिय असून विचारवंत आहेत)
विधानसभेच्या निवडणूकीचे वारे जोरात सुटले असून उमेदवारी दाखल करणाऱ्यांची आणि शक्तीप्रदर्शन करणाऱ्यांची चढाओढ लागली आहे. परंतु जनतेच्या प्रश्नांचे काय ? जनता खरेच या निवडणूकीत आपले प्रश्न सोडविणाऱ्यांचा विचार करेल का? असे असंख्य प्रश्न उभे राहिले आहेत. सत्ताधारी पक्ष रिंगणात असले तरी जनतेच्या न्याय हक्कांंसाठी, छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी नेहमी रस्त्यावर उतरणारे डावे या निवडणुकीत कुठे असणार याची वाच्यता होताना दिसत नाही. सध्या निवडणुकीत फक्त भाजप-सेना आणि कॉग्रेस-राष्ट्रवादी असे चित्र मिडिया दाखवत आहे. परंतु जनहितांच्या दृष्टीने डाव्यांचा विचार होणे गरजेचे आहे. जनसामान्यांचा आवाज असणाऱ्या डाव्यांची भूमिका निवडणुकीत महत्वपूर्ण ठरणार आहे.
एक काळ असा होता, डाव्या पक्षांचा बोलबाला होता, परंतु आता चित्र बदलले आहे. डाव्यांचा जनाधार घटलेला आहे, याचा विचार डाव्या पक्षांनी करणे गरजेचे आहे. १९७८ ला डाव्यांचे १३ आमदार होते, त्यानंतर डाव्या पक्षांना उतरती कळा लागली. आज डाव्यांचे त्यात माकपचा एक आणि शेकापचे तीन असे फक्त चार आमदार आहेत. डाव्या पक्षांनी सातत्याने आपला जनधार गमवलेला आहे. याला जनतेशी तूटलेला संपर्क हे ही एक कारण आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष , शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण, फॉरवर्ड ब्लॉक, जनता दल (सेक्युलर) इत्यादी पक्ष डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूकीत उतरले आहेत. ते प्राबल्य असलेल्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार असून माकप १४ तर भाकप १५ जागा लढविणार आहे. तर शेकाप रायगड, सोलापूर बरोबरच कोल्हापूरमध्ये निवडणूक लढणार आहे. डाव्या आघाडीची कॉग्रेस-राष्ट्रवादी बोलणी सुरू असली तरी डाव्यांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात कॉग्रेस आघाडीने उमेदवारी देऊन नयेत असा डाव्या आघाडीच्या नेत्यांचा आग्रह असला तरी सर्वच ठिकाणी आघाडी होण्याचे चित्र दिसत नाही.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या पारंपारिक मतदारसंघ असलेल्या ठाणे-पालघरमधील डहाणू मतदारसंघातील उमेदवारास कॉग्रेस आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. परंतु सोलापूर मध्य, कळवण, नाशिक पश्चिम मध्ये आघाडी होण्याची शक्य दिसत नाही. तेथे हे एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. सोलापूर मध्य मतदारसंघातून माजी आमदार नरसय्या आडम, कळवण मतदारसंघातून आमदार जे. पी. गावीत रिंगणात आहेत. या दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. तर डहाणू मधून विनोद निकोले आणि नाशिक पश्चिम मधून डॉ. डी. एल कराड रिंगणात आहेत. माकपचा प्रभाव असलेल्या इतर ठिकाणी आघाडी होण्याची चिन्हे नाहीत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जनाधार काही वर्षापासून घटलेला असून खाते उघडण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंचा विचार जिवंत ठेण्यासाठी सतिशचंद्र कांबळे कोल्हापूर उत्तर मधून रिंगणात आहे. शेतकरी कामगार पक्ष एकेकाळी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांपैकी एक होता. ग्रामीण भागात त्यांची चांगली पकड होतीच, परंतु जनतेशी नाळ जोडलेली होती. कोल्हापूर हा तर एकेकाळी शेकापचा गडच होता. परंतु शेकाप टिकाव धरू शकला नाही. कोल्हापूरमध्ये शेकाप दोन जागा लढणार असून रायगड आणि सोलापूरातील सांगोला मतदारसंघ सोडला तर इतर ठिकाणी पक्ष खालवलेला दिसतो.
जनआंदोलनात डावे नेहमी अग्रेसर राहिले आहेत. जनतेच्या न्याय हक्कासाठी ते नेहमी रस्त्यावर असतात. जनविरोध धोरण सरकारला मागे घेण्यास भाग पाडतात. परंतु त्याचे रूपांतर मतामध्ये झालेले दिसत नाही. याचा डाव्यांनी निवडणूकीच्या दृष्टीने विचार केला पाहिजे.
महाराष्ट्राच्या राजकारणातही डाव्यांनी महत्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्यानंतर डाव्यांनी नेहमी श्रमिक, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, युवकांच्या न्याय हक्कांंसाठी एल्गार पुकारला. या चळवळीने श्रीपाद अमृत डांगे, बी. टी. रणदिवे, क्रांतिसिंह नाना पाटील, गोदावरी परूळेकर, अहिल्याताई रांगणेकर, शामराव परूळेकर, जी. डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवडी, गंगाधर आप्पा बुरांडे असे दिग्गज नेते महाराष्ट्राला दिले. परंतु इतिहासाकडून वर्तमानचा वेध घेण्यात डावे कमी पडल्याचे दिसतात. हजारोंचा किसान लॉग मार्चने देशातील शेतकरी चळवळीला ऊर्जा दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न जनता आणि मिडियामध्ये चर्चेला आले.तरीही त्याचा प्रभाव मात्र निरंतर राहिला नाही. तो फक्त आंदोलनात दिसतो, निवडणूकीत डाव्यांचा विचार होताना दिसत नाही. जनतेने नाकारण्यामागील कारणांची मिमांसा करण्याची आणि जनाधार पुन्हा निर्माण करण्याची डाव्यांसमोर कसोटी आहे.
नवतरूणांपर्यंत डावे राजकारण पोहोचविण्याची आणि समजून देण्याची गरज आहे. फक्त सत्ता आणि व्यक्तीकेंद्रीत राजकारणाने समाजहित बाजूला पडत चालले असताना ‘डावा’ हाच पर्याय होऊ शकतो! सर्व पक्षांचा विचार करता व्यक्तीवादी, सत्तापिपासू, भ्रष्टाचार याला डावे तरी अपवाद आहेत. त्यांना ना इडीची भिती आहे, ना सीबीआयची भिती. ते जनतेच्या ताकदीवर लढतात. जनतेसाठी लढतात. जनता त्याची नक्कीच दखल घेईल. जनहिताच्या राजकारणाची पोकळी डावेच भरून काढू शकतात. निवडणूकीत उतरलेले डावे आपले किती गड राखणार आणि जिंकणार हे जनताच ठरवेल!