
मालाड, ता.9(वार्ताहर) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश महाराष्ट्रात लागू झालेला आहे. सुधारित सागरी अध्यादेशाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय श्री. महेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी संजय माने, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सचिन भालेराव, नीरज चासकर, परवाना अधिकारी श्री सानप, व बादावर यांच्या पथकाने 8 डिसेंबर 2021 रोजी रात्रीच्या सुमारास बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या 7 नौकांवर कारवाई केलेली आहे. त्यांपैकी तीन नौकांवरील एल.ई.डी. लाईट सह इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले असून नौका व जाळे जप्त करण्याची संबंधितांना नोटीस बजावलेली आहे.
बेकायदेशीर एल.ई.डी. लाईटस द्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. पथकाद्वारे सुमारे रुपये 25 लक्ष रकमेची एल.ई.डी. साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नोक-यांची नोंदणी क्रमांक व नौकेचे नाव
1. IND-MH-7-MM-2521
साई गोल्ड
2. IND-MH-7-MM-1371
दबाळूमाता
3. IND-MH-7-MM-66
अंबा
अशा बेकायदेशीर पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकां धारकांच्या विरोधात सुधारित अध्यादेशाच्या अनुषंगाने अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे प्रतिवेदन दाखल करणे व त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.