लेखक – सचिन कुळये
आज इंग्रजीमध्ये बोलता येणं ही काळाची गरज बनली आहे. कित्येक लोक असे आहेत ज्याना इंग्रजीतून संवाद साधावासा वाटतो पण मनात संकोच बाळगल्यामुळे बोलता येत नाही. लोक काय म्हणतील या विचारानेच त्यांची भंबेरी उडते. असे लोक इंग्लिश स्पिकिंग क्लास जॉईन करायला देखील कचरतात. त्यामुळे त्यांचा एखाद्या क्लासमध्ये जाऊन इंग्रजी शिकण्याच्या इच्छेला तिथेच पूर्णविराम मिळतो. पण घरबसल्या इंग्रजी शिकवणारे विविध अॅप सध्या उपलब्ध आहेत आणि यापैकीच एक उपयुक्त अॅप म्हणजे इंगुरू (enguru). बंगळूरूमधील स्टार्टअप कंपनी किंग्ज लर्निंग निर्मित हे अॅप वापरण्यासाठी अतिशय सोपे आणि मनोरंजक असून इंटरॅक्टीव खेळांद्वारे ते इंग्रजी शिकवते. म्हणजे खेळता खेळता तुमच्या इंग्रजी बोलण्यात सुधारणा घडून येते. इंगुरूचे उद्दिष्ट हे अधिकाधिक सरावाच्या माध्यमातून लोकांच्या इंग्रजीमध्ये बदल घडवून आणण्याचे आहे. इंग्रजीचा सर्वाधिक उपयोग हा कामाच्या ठिकाणी होत असल्यामुळे रोजगार संबंधित शैक्षणिक अनुभव देण्यावर या अॅपचा सर्वाधिक भर आहे. जर इंग्रजी चांगले असेल तर नोकरीत देखील वरच्या हुद्द्यावर जाण्यास मदत होते म्हणूनच हे अॅप एका दुकानातील नोकराच्या कॉर्पोरेट प्रवासाबद्दल माहिती देते. यात सुरुवातीला सेल्स पदावर नोकरीवर असणारी व्यक्ती जसजसे इंग्रजी सुधारत जाते तस तसे एक एक हुद्दा पादाक्रांत करत अखेरीस इंग्रजी भाषेतील प्रभुत्वामुळे मॅनेजर लेवल पर्यंत कसे पोहोचते याचा अत्यंत रोचकपणे उलगडा करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्रजी शिकणा-यांसाठी देखील ही एक प्रेरणा ठरते. कामाच्या जागी ग्राहक, सहकारी तसेच व्यवस्थापक यांच्यासोबत घडणा-या वास्तववादी संवादाच्या माध्यमातून आणि माहितीपूर्ण ट्रेनिंग सेशन्सद्वारे भाषा कौशल्य सुधारण्यावर यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. लँग्वेज ट्रेनिंग सेशनचा एक भाग असलेला हा गेम खेळताना युजर देखील या खेळाचाच एक भाग बनून इंग्रजी भाषा शिकत जातो. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध असून ते एकदा डाऊनलोड केल्यावर विना इंटरनेट आणि वायफाय कनेक्शन देखील वापरता येते.