रत्नागिरी, (आरकेजी) : बस थांब्यावर एसटी वाट पहात उभ्या असणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज गणेशगुळे येथे घडली. सुरेखा शिंदे असे महिलेचे नाव आहे. हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली. तिच्या चेहऱ्यावर बिबट्याने पंजाने हल्ला केला.
गणेशगुळे वाजरेकर वाडी येथे सुरेखा शिंदे या एसटीची वाट पहात होत्या. याचवेळी तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने सुरेखा यांच्या अंगावर उडी घेत धारधार पंजाने हल्ला केला. पहाटे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. हल्ला झाल्यानंतर सुरेखा यांनी आरडाओरडा केला. यामुळे ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली, तो पर्यंत बिबट्याने पळ काढला.
जखमी सुरेखा यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर तीव्र जखमा झाल्या आहेत. काही दिवसांपासून बिबट्याचा संचार या गावात आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.