
रत्नागिरी : रत्नागिरीतल्या गणेशगुळे-मेर्वी पंचक्रोशीत बिबट्याची दहशत पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. कारण दुचाकीवरून घरी जाणाऱ्या सात जणांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास कुंभारघाटी ते गणेशगुळे फाट्या दरम्यान बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ला केला. दरम्यान जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गणेशगुळेचे सरपंच संदीप शिंदे आणि विश्वास सुर्वे हे घरी निघाले होते. गणेशगुळेला जात असतानाच बिबट्याने हल्ला केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी निखिल साळवी व बळीराम जोशीलकर याच्यावर बिबट्याने हल्ला केला. पुन्हा थोड्या वेळाने मेरवी गावचे रहिवासी निलेश म्हाद्ये यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले. याच मार्गावर पुन्हा काही मिनिटांनी कशेळी येथील ग्रामस्थ नीलेश नाटेकर, मंजुनाथ आदी यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाला. हल्ला करणारे दोन बिबटे असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या सर्व जखमींवर पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर काहींना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं..
या परिसरात बिबट्याकडून होत असलेल्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्यापही यश आलेले नाही.















