
रत्नागिरी, प्रतिनिधी : भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र राहणार आहे. कारण खेड शहरानजीकच्या जगबुडी नदीपात्रात कोकणातील सर्वात मोठं क्रोकोडाईल पार्क उभं राहणार आहे. क्रोकोडाईल पार्क व बोटिंगची व्यवस्था करण्यासाठी व त्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी नगरविकास खात्याकडून नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या निमित्ताने जगबुडी नदीकिनारी देवणे बंदर परिसरात आ.योगेश कदम, मेरीटाईम बोर्ड, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी या ठिकाणी पहाणी केली.
खेड शहरानजीक जगबुडी नदीपात्र आणि परिसराला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे. त्यातच मुंबई – गोवा महामार्गावरील होणारे चौपदरीकरण, देवणे येथील नारंगी नदीवर झालेला पुल यामुळे खेड तालुका सौंदर्याने खुलत आहे. शिवसेना नेते आ. रामदास कदम यांच्या सहकार्यातून शहराच्या मधून वाहणा-या जगबुडी नदी पात्रात बोटिंग, पर्यटकांसाठी विश्रांतीगृह व मगर दर्शनासाठी क्राॅकोडाईल पार्क उभे रहावे यासाठी आ.योगेश कदम यांनी प्रयत्न सुरू केले होते. खेड शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि सुंदर खेड स्वच्छ खेडच्या संकल्पनेत भर टाकणाऱ्या तसेच पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणा-या प्रकल्पाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नऊ कोटीचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करण्यास हिरवा कंदील दिला. त्यामुळे आगामी काळात खेड बंदर परिसरात पर्यटकांना विश्रांतीसाठी विश्रांतीगृह, उपहारगृह, बोटींग आणि क्राॅकोडाईल पार्क उभे राहणार आहे. पर्यटकांना थांबण्याची सुविधा, बोटींग आणि क्राॅकोडाईल पार्क याचा पाठपुरावा करून हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आ.कदम हे सतत प्रयत्नशिल आहेत.