Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. याच अनुषंगाने राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत गोरेगाव (पूर्व) परिसरातील आरे कॉलनी येथील वन परिसरात असणाऱ्या खांबाचा पाडा या आदिवासी पाड्यासह वरळी कोळीवाडा नजीकचे आदर्श नगर आणि शीव परिसरातील प्रतिक्षा नगर अशा ३ ठिकाणी लसीकरण केंद्रांचे लोकार्पण आज (दिनांक २ ऑगस्ट २०२१) झाले.
खांबाचा पाडा येथील लसीकरण केंद्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तर आदर्श नगर आणि प्रतिक्षा नगर येथील लसीकरण केंद्र बृहन्मुंबई महानगरपालिका व रिलायन्स फाऊडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरु करण्यात आले आहे.
या लोकार्पण प्रसंगी संवाद साधताना श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, मोफत लसीकरणासाठी खासगी रुग्णालये व संस्था यांनी पुढे यावे. यामुळे लसीकरणाची संख्या व वेग वाढून आपल्याला लवकरात-लवकर आणि अधिकाधिक लोकांचे लसीकरण करणे शक्य होईल. सद्यस्थितीत लसीकरणाचे महाराष्ट्रातील आकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, तब्बल १ कोटी नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याचा टप्पा देशभरातील राज्यातून सर्वप्रथम महाराष्ट्राने गाठला आहे. त्यासोबतच इतर राज्यांनीही लसीकरण झपाट्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. जोपर्यत सगळ्यांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. इतर देशांची उदाहरणे बघितले असता लशीच्या २ मात्रा घेतल्यानंतरही मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोरोना अजूनपर्यंत पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधासाठी मास्क योग्यप्रकारे लावणे, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुणे आणि एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे या बाबी सर्वांनी आपापल्या स्तरावर काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले.
श्री. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी व त्यांचा संपूर्ण चमू अतिशय चांगले काम करीत आहे. लसीकरण जेवढे वेगाने पूर्ण होईल, तेवढे नागरिकांना आपल्याला सुरक्षित करता येईल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
या लोकार्पण प्रसंगी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, आमदार श्री. रवींद्र वायकर, आमदार श्री. सुनील प्रभू, आमदार श्री. रमेश लटके, आरोग्य समिती अध्यक्षा श्रीमती राजुल पटेल, प्रभाग समिती अध्यक्ष श्री. रामदास कांबळे, माजी मंत्री श्री. सचिन अहिर, नगरसेवक श्री. मंगेश सातमकर, नगरसेविका श्रीमती हेमांगी वरळीकर व नगरसेविका रेखाताई रामवंशी यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, सह आयुक्त (परिमंडळ ४) श्री. भारत मराठे, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. हर्षद काळे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे, ‘जी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे, ‘एफ उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे, ‘पी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. संतोष धोंडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी (प्रभारी) श्रीमती मंगला गोमारे, रिलायन्स फाऊंडेशनचे प्रतिनिधी यांच्यासह इतर मान्यवर, संबंधीत अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक हे उपस्थित होते.
आज लोकार्पण करण्यात आलेल्या तीनही लसीकरण केंद्रांद्वारे सुमारे दीड लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. पैकी, खांबाचा पाडा लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळासह लस साठ्याची संपूर्ण व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. तर, आदर्श नगर आणि प्रतिक्षा नगर येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी आवश्यक ती डॉक्टर मंडळी, परिचारिका, कर्मचारी आणि कोव्हॅक्सिन लशीच्या मात्रा इत्यादी व्यवस्था रिलायन्स फाऊंडेशन द्वारे मोफत पुरविण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांनी दिली आहे.














