
प्रातिनिधीक
रत्नागिरी : लांजा एस .टी बस स्थानक परिसरातील लाखो रुपयांची सागवान वृक्षे कवडीमोल किमतीत विकण्यात आली आहेत. बसस्थानक नुतनीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्यामुळे एस. टी. बस स्थानकाची नवीन इमारत अन्य ठिकाणी बांधण्यात येणार आहे. याचाच फायदा घेत एस.टी. अधिकार्यांकडून हा प्रकार घडवण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ही झाडे विकताना याचा जाहीर लिलाव होणे आवश्यक होते. निविदा काढण्याची गरज होती. मात्र कोणतीच निविदा प्रणाली न आणता आपल्याच मर्जीतील व्यापाऱ्याला विकली गेली आहेत.
सागवानच्या माध्यमातून एस. टी .ला लाखोंचा फायदा मिळाला असता, असे असताना अधिकाऱ्यांनी निविदा न काढता केलेल्या प्रकारामुळे मनमानी कारभार समोर आला आहे.
या बाबत कनिष्ठ अभियंता एस. डी. जाधव यांनी निविदा कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध केली नसल्याचे मान्य केले. पण एस .टी. बस स्थानकात फलकावर नोटीस लावली असल्याचे त्यांनी सांगितले.परंतु, राज्य सरकारच्या निर्णयानुसार वृत्तपत्रात जाहीर निविदा काढण्याचे सक्त आदेश आहेत. असे असताना अशी कोणतीच प्रक्रिया या ठिकाणी झाली नाही. त्यामुळे हि लिलाव प्रक्रिया संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.
हा संपूर्ण प्रकार कोणत्या अधिकाऱ्याने केला? निविदा न काढण्यामागे त्यांचा हेतू काय होता? या ठिकाणी असलेली झाडाची बाजार भावाने काय किंमत आहे? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा विभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने करावी अशी मागणी लांजा येथे जोर धरू लागली आहे/














