कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकेसह, ऑक्सिजन मशीन तसेच स्टीमरची मदत
रत्नागिरी, प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तसेच नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड धावून आले आहेत. लाड यांनी लांजा तालुक्यातील देवधे कोविड केअर सेंटरसाठी अद्ययावत अशी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. तसेच ऑक्सिजन मशीन तसेच इथल्या पेशंटसाठी स्टीमर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच इथल्या रुग्णांना हळदीचं दूध देण्याची व्यवस्था देखील त्यांनी केली आहे. आज उपक्रमांचा देवधे कोविड सेंटर येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार हुसनबानो खलिफे, माजी सभापती श्रीकृष्ण हेगिष्ठे, तहसीलदार समाधान गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे, डॉ संकेत पेडणेकर आदी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. लांजा तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही. अनेकजण रुग्णवाहिकेचे अव्वाच्या सव्वा पैसे घेतात, मात्र सर्वसामान्य रुग्णांना ते परवडत नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. ही गैरसोय लक्षात घेऊन जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तसेच नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी ना नफा ना तोटा तत्वावर लांजा तालुक्यासाठी एक अद्ययावत अशी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. लांजा तालुक्यातील देवधे कोविड सेंटर इथं आज या रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच सध्या रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे, ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने आज अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत, देवधे येथील कोविड सेंटर येथे ऑक्सिजन अभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अविनाश लाड यांनी ऑक्सिजन सेरेमीटर मशीन देवधे येथे उपलब्ध करून दिली आहे. तसेच रुग्णांना वाफ घेण्यासाठी स्टीमर आणि इथल्या रुग्णांना रोज रात्री हळदीचं दूध देण्याची व्यवस्था काँग्रेसकडून करण्यात आली असल्याची माहिती अविनाश लाड यांनी यावेळी दिली. अविनाश लाड देवधे कोविड सेंटरच्या मदतीसाठी अशाप्रकारे धावून आल्याने तालुका प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहेत.