रत्नागिरी (आरकेजी) : लांजा शहरातील कुक्कुटपालन व पुरातवाडी येथे सहा महिन्याच्या फरकाने घडलेल्या बंपर चोर्याचा तब्बल पाच वर्षांनी छडा लावण्याची दमदार कामगिरी लांजा पोलीसांनी केली. आरोपीला अटक करून त्याच्याकडून २२ तोळे सोने हस्तगत केले.
लांजा शहरातील पुरातवाडी येथील अनिल संगाप्पा पुरात हे ६ आॅक्टोबर २०१३ रोजी परगावी गेले होते. त्यावेळी रात्री घरी कुणीही नसल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांने घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम एकूण २ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला होता. सहा महिन्यानंतर पुन्हा कुक्कुटपालन कुंभारवाडी मध्ये २६ एप्रिल २०१४ रोजी रात्री अकबर आब्बास नेवरेकर यांचे सर्व कुटुंबिय घर साफ केले होते. जवळपास अर्धा किलोचे दागिने असा १२ लाख रूपयांचा एेवज लांबविला होता. लांजा शहरात पुरातवाडी येथे सन २०१३ – २०१४ या साली ओलवीन डिसोझा (वय – २९) राहणार गोवा – दोडामार्ग हा गवंडी काम करत होता. या दोन्ही घरफोड्या करून त्याने दोडामार्ग येथे पोबारा केला होता. मात्र चोरी करण्याच्या जडलेल्या सवयीमुळे सिंधुदुर्ग येथे त्यांने चोरी केली. त्यानंतर दोडामार्ग येथे चोरी केली आणि तो पकडला गेला. पोलिसांनी यावेळी केलेल्या चौकशीत त्याने लांजा येथे चोर्या केल्याचे कबूली दिली. लांजा पोलिसांना याची माहिती मिळताच रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक रविराज फडणवीस व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी, लांजा पोलीस उपनिरीक्षक पंडित पाटील, शांताराम पंदेरे, पाडळकर या टीमने संयुक्तपणे कारवाई करून २३ एप्रिल २०१८ रोजी दोडामार्ग पोलीस ठाण्यातून अटक केली. तसेच कोल्हापूर आजरा येथूनत त्याने विक्री केलेले २२ तोळे सोने हस्तगत केले, अशी माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंडित पाटील हे करीत आहेत.