रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): लांजा नगरपंचयातीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडणुकीवरून ४ नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज (८ फेब्रुवारी) अंतिम सुनावणी आहे.
पक्षादेश डावलून शिवसेनेला मतदान केलेल्या लांजा कुवे शहर विकास आघाडीच्या चार नगरसेवकांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. १० ऑगस्ट रोजी लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्ष निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत अनपेक्षितरित्या शिवसेनेचे सुनील कुरूप नगराध्यक्ष तर शहर आघाडीतून फुटून गेलेले मनोहर कवचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. नगरपंचायतीत लांजा कुवे शहर विकास आघाडीचे ११ तर शिवसेनेचे ६ नगरसेवक आहेत. पण प्रत्यक्षात नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेला १० तर शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना ६ तर मानसी डाफळे यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत स्वतःला आणि उप नगराध्यक्ष निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. या प्रकरणी गटनेता संपदा वाघधरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या बाबतची याचिका दाखल करून लांजा शहर विकास आघाडीतून फुटलेले परवेश घारे ,मनोहर कवचे ,सुगंधा कुंभार ,आणि मुरलीधर निवळे याना पक्षांतर्गत कायद्या नुसार अपत्रात ठरवावे अशी मागणी केली होती. याबाबत आज अंतिम सुनावणी ठेवण्यात आली असून दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमका काय निकाल लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.