ललित प्रभाकरला अनेक वैविध्य पूर्ण भूमिकांमधून आपण पाहतच असतो. अशाच एका हटके भूमिकेतून ‘स्माईल प्लीज’ म्हणत ललित आपल्या भेटीला येतोय. त्याच्या या नवीन भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल त्याच्याशी मारलेल्या गप्पा.
‘स्माईल प्लीज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी निवड कशी झाली?
– माझा आणि नेहा महाजनचा प्रमुख भूमिका असलेला ‘टीटीएमएम’ चित्रपटाचा एक स्पेशल शो ठेवला होता. त्या शोसाठी विक्रम फडणीस आले होते. त्यांनी माझा अभिनय पहिला आणि ते मला लगेच येऊन भेटले. तेव्हा त्यांनी सांगितले की, “मला तुझा अभिनय खूप आवडला आहे. माझ्या पुढच्या चित्रपटात मी तुला नक्की घेणार.” मला त्यांचे बोलणे आवडले. पण, मी ते बोलणे विसरून गेलो. मात्र विक्रम सरांनी मला दिलेला शब्द पाळला. त्यांनी मला त्यांच्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटात मला एक चांगली आणि हटके भूमिका दिली.
‘स्माईल प्लीज’मधील भूमिकेविषयी काय सांगशील?
– आताच माझ्या भूमिकेविषयी बोलणे जरा अवघड आहे. पण माझी भूमिका खूप सुंदर लिहली आहे. आणि त्यापेक्षा जास्त ती चांगली स्क्रीनवर दिसत आहे. मी या चित्रपटात एक महत्वाची अशी मध्यवर्ती भूमिका निभावत आहे. ज्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मकच असतो. जो प्रत्येक क्षण भरभरून जगतो आणि सर्वाना जगायला सांगतो.
दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव
– खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण, मला ह्या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम सर, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, सतीश आळेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली. यासाठी मी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा खूप आभारी आहे. विक्रम सर म्हणजे ऊर्जेचा एक साठाच आहे. ते न थकता कितीही काम करू शकता. आपल्या कामाबद्दल त्यांना प्रचंड आदर असून ते त्यांच्या कामाशी प्रामाणिकदेखील आहे. मुक्ता बर्वे आणि प्रसाद ओक हे दोघेही कसदार आणि अनुभवसंपन्न असे कलाकार आहे. त्यांच्या सारख्या मुरलेल्या कलाकारांकडून आमच्या सारख्या नवीन कलाकारांना शिकण्यासारखे खूप काही आहे. कामाबद्दल त्यांना प्रचंड आस्था आहे. सतीश आळेकरांबद्दल काय आणि किती बोलणार ते एक उत्तम लेखक, उत्तम अभिनेता तर आहेतच पण, ते एक उत्तम व्यक्ती आहे. या वयातही ते कामासाठी उत्साही असतात. तृप्ती आणि अदिती यांचा मी खूप मोठा फॅन आहे.
त्यांच्यासोबत काम करतानाही धमाल आली.
स्माईल प्लीज’ या चित्रपटाने मला खूप काही शिकवले आणि या चित्रपटाच्या टीमने देखील मला अनेक चांगल्या गोष्टी आणि चांगली माणसे दिली.
तुझे आगामी प्रोजेक्ट?
– मी एका हिंदी वेबसिरीज मध्ये काम करत आहे. या वेबसिरीजचे नाव आहे ‘नाईक रायकर्स’. लवकरच ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय ‘मिडीयम स्पाईसी’ नावाचा सिनेमा देखील मी करत आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे.