
मुंबई, ७ सप्टेंबर २०२५ : गिरगाव चौपाटीवर तब्बल नऊ तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी एकच जल्लोष केला. राजासाठी अत्याधुनिक तराफ्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. समुद्रात भरती असल्याने विसर्जन होत नव्हते. त्यामुळे गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली होती. राजा आमचे काही चुकल्यास माफ कर, अशी याचना करण्यात येत होती. ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता वाजत गाजत नेहमीच्या उत्साहात राजाला निरोप देण्यात आला.
असंख्य भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते. नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. ६ सप्टेंबर ला सकाळी १० च्या सुमारास विसर्जन मिरावणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी गिरगाव येथे पोहोचली. यावेळी भरती असल्याने राजाची मूर्ती नव्या अत्याधुनिक तराफ्यावर चढविण्यास अडचण येत होती. त्यामुळे विसर्जन करता येत नव्हते.
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने लालबागचा राजाचे विसर्जन तराफ्यावर केले जाते. त्याच पद्धतीने विसर्जन करण्यात आले. भरती लवकर आली. मुंबई पोलिस, महापालिका, माध्यमे यांचे आभार मानतो. विसर्जनाला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया मंडळाचे सचिव सुधीरभाऊ साळवी यांनी दिली.














