मुंबई, विशेष प्रतिनिधी ः लालबाग परिसरातील साराभाई इमारतीत रविवारी झालेल्या सिलिंडर स्फोटातील दोघांचा मृत्यू झाला असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.
लालबाग येथील साराभाई इमारतीतील लगीन घरात हदळी समारंभ सुरु असताना सिलिंडर मधून गॅस गळती झाली आणि स्फोट झाला. या दुर्घटनेत १६ जण जखमी झाले असून १२ जणांना केईएम रुग्णालयात तर ४ जणांना भायखळा येथील मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. केईएममध्ये उपचार घेत असलेल्या सुशीला बागरे (६२) या महिलेचा उपचारा दरम्यान रविवारी मृत्यू झाला तर सोमवारी पहाटे करीम (५०) या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १० पैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.
मसीनातील ३ जखमींची प्रकृती गंभीर
दरम्यान, भायखळ्यातील मसीना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ४ पैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.