रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : नॅशनल राष्ट्रीय मजदूर युनियनने कोकण रेल्वेची मान्यता प्राप्त युनियन म्हणून लाल बावट्याची निवड झाली आहे. कोकण रेल्वे कामगार संघटनेचा त्यांनी ४३० मतांनी पराभव केला. प्रतिष्ठा पणाला लावलेल्या या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागल्याने रेल्वे कामगार सेनेची निराशा झाली.
कोकण, गोवा आणि कर्नाटकमधील २२ केंद्रावर ९७ टक्के मतदान झाले होते. कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील विभागिय कार्यालयात आज मतमोजणी झाली. एनआरएमयु विरुध्द केआरसीएल यांच्यात चुरस निर्माण झाल्यामुळे काहीकाळी वातावरण तंग होते. घोषणाबाजीवरुन शाब्दिक चकमकही उडाली. त्यानंतर बंदोबस्तही वाढविण्यात आला. विशेष पथक दाखल झाल्यानंतर उपस्थित संघटनेच्या कार्यकर्त्यानी शांततेचा पवित्रा घेतला. रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. शेवटपर्यंत मतमोजणीत गुप्तता पाळण्यात आली होती. ४ हजार ८३९ असे एेकूण मतदान झाले. त्यात रेल्वे सेनेला ६७९ मते, नॅशनल राष्ट्रीय मजदूर युनिअनला २ हजार २८२, केआरसीएलला १ हजार ८५२ तर कोकण रेल्वे कामगार युनियनला अवघी ६१ मते मिळाली. लाल बावट्याने विजय मिळविल्यानंतर कार्यालयापुढे जल्लोष केला. याप्रसंगी उपस्थित राहीलेले लाल बावट्याचे नेते वेणू नायर यांनी कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वे मर्ज करण्यावर भर देणार असल्याचे जाही केले.