रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): लेखिका तेजा मुळ्ये यांच्या स्नेहझुला या लघुकथासंग्रहातून नातेसंबंधांची नाजूक वीण उलगडत जाते. छोट्या कथांतून रोजच्या जीवनातील अनेक प्रसंगी, मानवी मनाच्या कंगोर्यांचे दर्शन, त्यातील अस्वस्थता, संवेदना, सहवेदना, कनवाळूता, निस्सिम प्रेम व्यक्त होते, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन व ज्येष्ठ पत्रकार अभिजित हेगशेट्ये यांनी केले.
मांडवी येथील सी फॅन्स येथे ‘स्नेहझुला’च्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष राहुल पंडित, मुळ्ये उपस्थित होत्या. रवींद्र मुळ्ये यांनी स्वागत केले. तेजा मुळ्ये यांच्या आईचा सत्कार हेगशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अंजली व अबोली या मायलेकींनी सुरेल गीते सादर केली.
हेगशेट्ये म्हणाले की, स्नेहझुला म्हणजे नावीन्य, सृजनाचा आविष्कार आहे. लेखिकेने समाजातील घटना टीपकागदाप्रमाणे टिपल्या आहेत. आविष्कारमधील मुलं म्हणजे एकेक कथा, कादंबरी आहेत. त्या उलगडण्याचे काम लेखिकेने केले आहे. आज सी फॅन्समधून दिसणारा विस्तीर्ण समुद्र, लाटा व इथे सभागृहात या कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. मांडवीतील किनार्याचा चेहरामोहरा बदलावा.
नगराध्यक्ष पंडित यांनी लेखिकेचे कौतुक केले. अशा कथा लिहिण्यासाठी जगण्याविषयी कुतूहल, सुखदुःखांशी समरस व्हावे लागते. लेखिका मुळ्ये या गतिमंद मुलांना शिकवतात, हे काम खूप कठीण व संयमाचे आहे. हे भाव लेखनात उमटले आहेत. मुळ्ये यांनी आईच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन होत असल्याचा परमोच्च क्षण असल्याचे नमूद केले. लेखनासाठी मला आई, भावंडांकडून प्रेरणा मिळाली. माझ्या लिखाणातून वाचकाला वास्तवता तसेच आपलं वाटेल असे लिखाण केले.
नाट्यलेखक अनिल दांडेकर म्हणाले की, पालिका, शैक्षणिक संस्थांनी स्थानिक लेखकांना निमंत्रित करून व्यासपीठ द्यावे. स्थानिक महिला लेखिकांचा वारसा सांगताना डॉ. दिलीप पाखरे यांनी आज मुळ्ये यांची त्यात भर पडली आहे. त्यांचा लेखनप्रवास अधिक बहरू दे व पुरस्कार मिळू दे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. राजेंद्रकुमार घाग यांनी सूत्रसंचालन केले. लेखिकेची मोठी बहिण वनिता केळकर यांनी प्रास्ताविकामध्ये स्नेहझुलामधून जे नातेसंबंध दाखवले आहेत ते खर्या आयुष्यातही ती जपत असल्याचे सांगितले. अमृता मुळ्ये यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुळ्ये कुटुंबीयांसह आविष्कार संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, साहित्यिक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.