मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी) – जीव धोक्यात टाकून आगीशी सामना करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवांनाना फॉरेन टेक्नोलॉजीचा अभ्यासक्रम गिरवता येणार आहे. मुंबईत येत्या ८ ते १० मार्च या कालावधीत ‘लढा ३६०’ हा उपक्रम आयोजित केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवीन संकल्पना, मशीन्स हाताळणे आणि परदेशात आपत्तीकाळात अंमलात येणार्या नव्या कल्पनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. या उपक्रमात जगभरातील १६ टीम सहभागी होणार असल्याची माहिती, मुंबई अग्निशमन दल प्रमुख पी. एस. रहांगदळे यांनी दिली.
मुंबईत आगींचे सत्र कायम आहे. मागील वर्षीच्या अखेरीस आठवडाभरात लागलेल्या दोन मोठ्या आगीत एकूण २६ जणांचा बळी गेला होता. दिवसेंदिवस आगीच्या वाढीस लागल्या आहेत. जीवित आणि वित्तहानीचे प्रमाण देखील आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने अग्निसुुरक्षा नसणार्या व्यवसाय-आस्थापनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. याचबरोबर अग्निशमन दलातील जवानांना देखील परदेशी तंत्रज्ञानाचा अभ्यास शिकविण्याचा उपक्रम पालिका राबवणार आहे. आगी लागण्याचे बदलणारी कारणे, प्रकार यांच्याशी सामना करण्याचे प्रशिक्षण यामध्ये दिले जाणार आहे. कुठल्याही बाजूने अथवा कुठल्याही प्रकारची आग लागली तरी तिच्याशी दोन हात करण्यासाठी अमेरिकेतील फायर फायटर ट्रेनर मायकल जोसेफ यांच्याकडून सध्या अग्निशमन जवानांना धडे दिले जात आहेत. डायरेक्टर महाराष्ट्र फायर सर्व्हिस ऑफिसर, कलिना येथे हे ट्रेनिंग सुरू आहे. मुंबई फायर फायटरर्स टीम आणि नॅशनल फायर फायटर टीम यामध्ये सहभागी झाल्या आहेत. मुंबई अग्निशमन दल, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, गृह विभाग, अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात पोतुर्गाल, फ्रान्स, ग्रेट बिटन, जर्मनी, पोलंड, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, झेक प्रजासत्ताक आदी देशांमधील १६ संघ सहभागी होणार आहेत.