मुंबई : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्व जातीच्या सफाई कर्मचा-यांना लाड पागे समितीच्या मूळ शिफारशींनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्यात यावी. शासन परिपत्रकातील संदिग्धता दूर करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज येथे दिले.
मंत्रालयात आज सफाई काम करणा-या सर्व जातीच्या सफाई कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार गणपत गायकवाड, नगरसेविका खुशबु चौधरी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नरेश जाधव आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, महानगरपालिकांमधील सफाई कर्मचा-यांसाठी एकसारखे नियम लागू असावेत, मीरा भाईंदर महानगरपालिकेमधील कर्मचा-यांना हे नियम लागू असून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व जातीच्या सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या मूळ शिफारशीचा लाभ देण्यात यावा, तसेच वारसा हक्काने नियुक्ती करतानाही सर्व जातींमधील कर्मचा-यांचा एकसारखा विचार करावा. संबंधित शासन परिपत्रकातील संदिग्धता दूर करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडण्यात येईल असेही कांबळे यांनी सांगितले.