मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियान’अंतर्गत ४०दिवसात सुमारे सव्वा दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे.कामगार विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’चा ई- शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी करण्यात आला होता. विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत २८ योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार असून हे अभियान ४० दिवस सुरु होते.विशेष नोंदणी अभियानांतर्गत ४० दिवसात दोन लाख २४ हजार ५७७ बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. सहा विभागांमध्ये मुंबई विभागात सर्वाधिक तर सगळ्यात कमी नोंदणी नाशिक विभागात झाली आहे. नागपूर विभाग(३०९८१), अमरावती विभाग(२२६५० ), पुणे विभाग(५२१७९ ), मुंबई विभाग(७६२०६ ), नाशिक विभाग(१८२२४ ), औरंगाबाद विभाग(२४३३२ ), एकूण(२२४५७७ ).विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. १८ते ६०वर्षे वयोगटातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. इमारत व इतर बांधकाम (रोजगार, नियमन व सेवाशर्ती) अधिनियमातील मुळ व्याख्येत समाविष्ट २१ बांधकामावरील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. विविध योजनांचा लाभ मिळविताना नोंदणी शुल्क ठरविण्यात आले असून ते २५ रुपये इतके आहे. तर दरमहा वर्गणी एक रुपया आणि पाच वर्षांसाठी ६० रुपये आहे.बांधकाम कामगारांची नोंदणी करताना गेल्या वर्षभरात ९० त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र बांधकाम कामगारांकडून घेण्यात आले आहे. याबरोबरच कामगारांच्या वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराची 3 छायाचित्र, रहिवासी पुरावा,छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकची सत्यप्रतही घेण्यात आली आहे. मंडळाचे कामकाज गतिमान, पारदर्शक होण्यासाठी मंडळाच्या कामकाजाची एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी व त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे.