१९७० साली गिरणी उद्योग मुंबईत फार फोफावला होता.या काळात हा उद्योग अत्यंत भरभराटीला आला होता. एकंदरीतच सत्तर ते ऐंशी दशकाचा काळ हा टेक्सटाईल उद्योगाचा सुवर्ण काळच होता असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.मुंबईत त्या काळात सुमारे ६५ गिरण्या मोठ्या जोमाने सुरू होत्या.अशा गिरणी उद्योगात नोकरी मिळणं म्हणे फार प्रतिष्ठेचं मानलं जात असे.मुंबईच्या गिरणीत काम करणा-या तरूणाला लग्न करण्यात कोणतीही अडचण येत नसे. गिरणी कामगाराला लग्नासाठी आपली पोरगी द्यायला मुलीचे माता-पिता चटकन तयार होत असत.एवढी सुबत्ता व प्रतिष्ठा या उद्योगाला त्या काळात लाभली होती.
म्हणूनच कोकण,रायगड,पश्चिम महाराष्ट्रातले अनेक तरूण आपले नशीब आजमावण्यासाठी थेट मुंबईची वाट धरत.साधारण तीन चार महिन्यांच्या सर्वसाधारण प्रशिक्षणा (अॅप्रॅंटिसशिप) नंतर या गिरण्यांमध्ये नोकरीही मिळत असे. फक्त मेहनत,कष्ट करण्याची व शिकण्याची जिद्द हवी. ज्यांच्यात ती असे ते पुढे जात असत.अशाच एका तरूणाने गिरणी कामगार ते राष्ट्रीय मिल मजदूर संघ व महाराष्ट्र इंटक सरचिटणीस इथपर्यंतचा मोठा असा दैदिप्यमान पल्ला पार केला.
तो तरूण म्हणजे कोकणातील चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गावातील गोविंद जनार्दन मोहिते हे होत.गोविंदरावांचा जन्म कुंभार्ली सारख्या दुर्दम्य खेडेगावात १जून १९५० रोजी एका गरिब कुटुंबात झाला.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.त्यामुळे समोर आलेल्या प्रसंगाला बेधडकपणे सामोरे जाण्याची व्रूत्ती बालपणापासूनच त्यांच्यात बाणवली गेली होती. घरच्या गरीब परिस्थितीमुळे मनात इच्छा असूनही त्यांचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांना अर्थार्जनासाठी मुंबईची वाट धरावी लागली.१९६६ ला नोकरीच्या शोधात ते मुंबईला पोहोचले. सुरूवातीस त्यांनी छोट्या-छोट्या नोक-या स्विकारून पडेल ती कामे केली. ती करीत असतानाच त्यांना त्या काळच्या प्रसिद्ध असलेल्या खटाव मिलमध्ये नोकरी मिळाली. नोकरी मिळाली तरी शिक्षणाची आस त्यांना स्वस्थ बसू देईना. आयुष्यात काही बनायचे असेल तर शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे,हे ओळखून त्यांनी पुढे रात्र शाळेतून आपले शिक्षण पू्र्ण केले.
त्या काळात गिरणगावातील पगारवाढीपासून,हक्काची रजा, बोनस अशा अनेक प्रश्नांवरून आंदोलने होत असत. ही सारी आंदोलने त्यांनी अगदी जवळून पाहिली आहेत.गिरणी कामगारांच्या मागण्या ह्या संपाशिवाय कदापिही मिळू शकणार नाही,हा टोकाचा विचार त्यावेळी लालबावटा युनियनने गिरणी कामगारांच्या मनामध्ये रूजविला होता.परंतु कामगार महर्षी गं.दआंबेकरजींनी उठसूठ संपाशिवाय वाटाघाटी,लवाद, उपोषणासारखी प्रभावी आयुधं गिरणी उद्योगात नव्याने आणली होती.अखेरचे हत्यार म्हणजे संप त्याचा वापर सर्व आयुधं निष्काम ठरल्यावरच करावा, हा विचार आंबेकरजींनी आपल्या प्रत्यक्ष क्रूतीने सिद्घ करून दाखविला. आंबेकरजींच्या या भूमिकेत महात्मा गांधीजींचा वारसा होता.तो वारसा त्यानंतर आलेल्या अनेक नेत्यांनी पुढे नेला. आंबेकरजींच्या या विचारांचा पगडा गोविंदराव मोहिते यांच्या मनावर पक्का बसला होता.यातूनच या शांतता – विधायक विचाराच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाकडे गोविंदरावांचा ओढा अधिक वाढला.खटाव मिल कामगारांचे प्रश्न सोडविता – सोडविता ते १९७५ मध्ये खटाव मिल मधून राष्ट्रीय मिल मजदूर संघावर प्रतिनिधी म्हणून निवडून आले.अनेक यशस्वी आंदोलने त्यांच्या नेत्रूत्वाखाली झाली. गिरणीमध्ये काम करीत असतानाच त्यांनी रात्रशाळेतून अकरावी पर्यंतचे (जुनी मॅट्रिकं) शिक्षण पूर्ण केले.
एकेकाळी या गिरणी धंद्यातून सोन्याचा धूर निघत असे असं कौतुकाने बोलले जात असे.परंतु दरम्यानच्या काळात मु़ंबईतील जागांचे भाव वाढू लागले. मुंबईतील जागांना सोन्याचा भाव मिळू लागला आणि राजकीय नेत्यांची वक्रद्रूष्टी या गिरणी उद्योगावर पडली.अखेरीस
होत्याचे नव्हते झाले.राजकीय नेत्यांची लालसा आणि सरकारची व गिरणी मालकांची या गिरणीधंद्याबाबतची अनास्था यामुळे या उद्योगाची फार धुळधाण उडाली व पार रया गेली.
मुंबईतील गिरणी उद्योगाला १९८२ च्या संपानंतर एकदम कलाटणी मिळाली.संपानंतर अनेक गिरण्या मालकांनी चालविल्या नाहीत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मुंबईपासून दिल्लीपर्यंत मोठे लढे उभे केले. पुढे सरकारने मुंबईतील 13 गिरण्या ताब्यात घेऊन या गिरण्यांचे राष्ट्रियीकरण केले.या काळात राष्ट्रीय मिल मजदूर
संघाने केलेला लढा संघर्षमयी होता.गोविंदराव मोहिते यांनी या लढ्यात एखाद्या बिनीच्या सैनिकाप्रमाणे भाग घेतला होता.1992 मध्ये आलेल्या खाजगीकरण,उदारीकरण,आणि जागतिकीकरण ( खाउजा)धोरण. या खाउजा धोरणाचा फटका या गिरणी उद्योगाला बसला.खुली अर्थव्यवस्था उदयाला आली. अनेक चांगल्या व भरभक्कम उद्योगांवर मरगळ ओढवली. यातून गिरणी उद्योगही सुटला नाही. मुंबईमधील एकामागोमाग एक गिरण्या बंद पडल्या.१९९५ च्या सुमारास सचिनभाऊ अहिर यांच्यासारखे युवा व खंबीर नेतूत्व संघाला लाभले आणि गिरणी कामगार चळवळीला नवी दिशा आणि द्रूष्टी मिळाली.गिरण्या बंद पडल्यानंतर कामगारांच्या देणीचा प्रश्न ऐरणीवर आला.सुरूवातीस गिरणी मालकांनी गिरण्या बंद असल्याचे कारण पुढे करून कामगारांची न्याय देणी देण्यास टाळाटाळ केली.संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री तसेच आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस रामचंद्र हुलावळे यांनी या प्रश्नामागे कामगारांची ताकद उभी केली.या प्रश्नासाठी आंदोलने केली.प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. याद्वारे अनेक कामगारांना त्यांची कायदेशीर देणी मिळवून दिली. या प्रश्नाच्या सोडवणूकीत गोविंदराव मोहिते यांचा इतर सहकारी पदाधिकाऱ्यांप्रमाणे महत्वाचा वाटा राहिला आहे. १९९७ साली बंद पडलेल्या खटाव मिलच्या कामगारांची देणी मिळवून देण्यासाठी गोविंदरावांनी तेथील कामगारांची एकजूट संघटनेच्या मागे कायम ठेवली.या गिरण्यांमधील कामगारांना दहा वर्षांच्या अथक प्रयत्नाने व चिकाटीच्या लढ्याने त्यांची देणी अखेर मिळाली.हा संघटनेचा विजय मानला जातो.
मुंबईतील गिरणगाव व गिरणी कामगार हा संपूर्ण देशातील लढ्याचे स्फुर्तीस्थान आहे,हे त्यावेळच्या लढ्याने सिद्ध झालेले आहे.पन्नास वर्षांपूर्वी गिरण्यांमधील रोजगाराच्या निमित्ताने येथे वसलेला गिरणगावातील कामगार हा मुंबईतून हद्दपार होता कामा नये हे संघाचे धोरण आहे. म्हणूनच गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेत्रूत्वाखाली सर्व कामगार संघटनांना एकत्र करुन या माध्यमातून निषेध,मोर्चे,धरणे, उपोषणे यासारख्या सनदशीर मार्गाने आंदोलने करून लढा दिला जात होता.त्याचीच परिणती म्हणून शासनाने आतापर्यंत चारवेळा लॉटरी काढली असून यातील १५ हजार ८९३ कामगारांची घराची लॉटरी काढली आहे. गिरणी कामगारांची संख्मा १.५० लाख असून यातील आतापर्यंत ८०० जणांना घराच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित सर्व कामगारांना घरे मिळावीत यासाठी संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या खांद्याला खांदा लावून संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते हे इतर सहकारी संघटनांच्या साथीने अहोरात्र झटत आहेत.
गोविंदराव हे केवळ संघटितच नव्हे तर असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही त्यांचा न्याय हक्क मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात.उदा. नाका कामगार,घरकामगार, टँक्सी-रिक्षा चालक,फिल्म इंडस्ट्रीतील कामगार यासारख्या असंख्य असंघटित कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळावा यासाठी ते अविरत परिश्रम करीत असतात.असंघटित 10 हजार कामगारांचे ते नेत्रूत्व करीत आहेत.
मुंबई, ठाणे,रायगड,रत्नागिरी, गोवा,नासिक,कोल्हापूर,सोलापूर,सूरत आदि ठिकाणी इंजिनिअरींग, ऑटोमोबाईल्स,
फार्मासिटिकल्स,हाँटेल्स, हाँस्पिटल्स,पेपर्स,पेट्रोलपंप, केमिकल्स अशा विविध १९० आस्थापनांमध्ये त्यांची संघटना कार्यरत आहे.
गोकुळनगर,ठाणे येथील १९९२ साली स्थापन झालेल्या जाग्रूती को.ऑप.सोसायटी या संस्थेत गेली २५ वर्षे अध्यक्षपदी त्यांनी निस्वार्थपणे काम केले आहे.तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघ कन्झुमर या ग्राहक सोसायटीत गेली १५ वर्ष कार्यरत आहेत.महाराष्ट्र इंटकच्या ह सरचिटणीस पदाचीही धुरा ते समर्थपणे वाहत आहेत.
गोविंदराव मोहिते यांची अनेकांना कामगारनेते म्हणून जरी ओळखअसली तरी त्यांचा खरा पिंड हा मातीतल्या खेळाडूचा आहे. मुंबईच्या तांबड्या मातीत ते स्वत: कबड्डी खेळलेले आहेत. विक्रोळी येथील उत्कर्ष व्यायाम शाळेचे ते १९७३या स्थापनेच्या काळापासून पदाधिकारी राहिले आहेत.आयडियल स्पोर्टस अँकँडमी,या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून शरीरसौष्ठव,कँरम, व्हाँलीबाँल,बुद्धीबळ,क्रिकेट, चित्रकला या स्पर्धा मुंबईत आयोजित करून खेळांना ते उत्तेजन देत असतात.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा क्रिडाप्रमुख म्हणून गेली अनेक वर्षे ते गिरणगावात कबड्डी ,शुटींगबाँल यासारख्या स्पर्धा राबवून गिरणगावातील खेळाचा वारसा जतन करीत आहेत.
आयडीयल स्पोर्टस अँकँडमीच्यावतीने राबविण्यात आलेल्या व्यसनमुक्तीवरील अनेक स्पर्धा,गणेश दर्शन स्पर्धा लोकप्रिय ठरवून गोविंदराव यांनी आपले निखळ कलाप्रेम आधीच सिद्ध केलेले आहे.त्यांचा पिंड खेळाडूचा असल्यामुळे व्यवहारी जगातही त्यांनी ही खिलाडूव्रूत्ती कायम ठेवली आहे.यामुळे अनेक संकट व अपयशावर त्यांनी आपल्या खिलाडू्व्रूत्तीने मात केली आहे म्हणून त्यांचा चेहरा सदैव प्रफुल्लीत दिसून येतो.
आजवर गोविंदराव मोहिते यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.महाराष्ट्र शासनाचा २००३ साली प्रतिष्ठेचा “गुणवंत कामगार पुरस्कार ” मिळालेला आहे. मुंबईतील प्रसिद्ध श्री शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने कामगार चळवळीतील निस्सीम कार्याबद्दल “श्रमनिष्ठा” पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. कोकणातील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखणीय कार्याबद्दल “कोकण गौरव” पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. यासारखे अनेक विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
गोविंदराव मोहिते यांचा जीवन आलेख नेहमीच उंचावत राहिला आहे.याचे कारण म्हणजे त्यांना असलेली सामाजिक कार्याची कणव,कामाचा ध्यास आणि दु:खी,कष्टी ,माणसाबाबत त्यांच्या मनात असलेली कळकळ यातूनच गोविंदराव मोहिते यांचे कार्य सर्वस्पर्शी राहिले आहे. कामगार,सहकार,क्रिडा,शैक्षणिक सामाजिक,सांस्क्रूतिक, या सर्वच क्षेत्रात गोविंदराव हे सतत कार्यरत असतात.अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वास त्यांच्या अम्रूत महोत्सवी वाढदिवसा निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
. -राजेंद्र साळसकर