- रत्नागिरी (आरकेजी) : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपने महागाईचीच बुलेट ट्रेन आणली आहे. सर्वसामान्य जनता या महागाईत भरडली जात आहे. त्यामुळे ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’? असा संतप्त सवाल राज्य सरकारला विचारत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना महिला जिल्हा आघाडीच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. सुमारे दोन हजारांहून अधिक महिला या मोर्चात सामील झाल्या होत्या.
वाढत्या महागाई विरोधात सध्या जनता त्रस्त झाली आहे. अन्नधान्याच्या किंमती वाढत असताना दुसरीकडे पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याच मुद्द्यावरून सत्तेत असलेली शिवसेना आक्रमक झाली आहे. याच संदर्भात आज रत्नागिरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपा विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. भाजपाला सत्तेवर आणून मोठी चूक केली अशा घोषणा यावेळी महिलांनी दिल्या. कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा असे फलक यावेळी पाहायला मिळाले. येत्या काही दिवसात महागाई कमी झाली नाही. तर राज्यभरात या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. अच्छे दिन कधी येतील असा प्रश्न सुद्धा महिला विचारायला विसरल्या नाहीत. आताच्या महागाईमुळे जनतेचं कंबरडे आधीच मोडलं आहे. त्यात सरकार बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प आणत आहे, त्यामुळे गृहिणी अधिक संतापल्या आहेत यावरूनहि घोषणा देण्यात आल्या. सध्याच्या भाजपा सरकारने राज्यात महागाईची बुलेट ट्रेन आणली आहे. महागाई कमी होत नाही तोपर्यंत शिवसेना माघार घेणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला.