साखरपा : साखरपा पंचक्रोशीतील तिल्लोरी कुणबी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व समाज प्रबोधन सोहळा रविवार साखरपा येथील लाड सभागृहात उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून माधव अंकलगे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इंजिनिअर, मेडिकल, आयटीआय यासहविविध क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले तर कोणतेही क्षेत्र अवघड नाही मात्र विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने परिश्रम घेतले तर यश दूर नाही असेही मार्गदर्शन करताना सांगितले.
या कार्यक्रमात पंचक्रोशीतील सुमारे २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गुलाबपुष्प आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तिल्लोरी कुणबी समाज साखरपा पंचक्रोशी या संस्थेचे अध्यक्ष सिताराम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट, सर्वोदय छात्रालय (रत्नागिरी) अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ॲड. संदिप ढवळ, राजापूर कुणबी पतसंस्थाचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते संजय शितप, मुर्शी गावचे माजी सरपंच अमोल लाड, हरीभाऊ धुमक, दत्ता घुमे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना ॲड. संदिप ढवळ यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले. तसेच संविधानाचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्व आणि संविधानाचे वाचन प्रत्येक घराघरात झाले पाहिजे, असे सांगितले. प्रकाश मांडवकर यांनी राजापूर कुणबी पतसंस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे पदाधिकारी प्रमोद जायगडे, बापू ढवळ यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत घागरे, प्रास्ताविक रामचंद्र घाणेकर यांनी केले. जाधव गुरूजी यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश ढवळ, शेलार गुरूजी, रोहिदास मांडवकर, रविंद्र जायगडे, संदिप जोयशी, सुनील शिवगण, पांडुरंग गोरूले गुरुजी, बाईंग गुरुजी, गणपत भायजे आदींनी परिश्रम घेतले.