मुंबई : सामाजिकदृष्ट्या आपण सर्वांनी एक राहायचे आहे. आपले प्रश्न, समस्या आपल्यालाच सोडवायच्या आहेत. दुसरा कुणी तुमचा विचार करणार नाही. म्हणून नवी आव्हाने समाजाने स्वीकारून पुढे चालायला हवे. काहीतरी नविन निर्माण व्हायला हवे असे वाटत असेल तर झालं गेलं विसरून जावे व पुन्हा त्याच जमाने कामाला लागावे, मी कुणालाच दोष देणार नाही. आपल्या पुढे अनेक आव्हाने आहेत त्यासाठी सर्वांनी संघटितपणे राहून पुढे चालू या. मी तुमचाच आहे व समाजासाठी जे जे शक्य आहे ते करीत राहीन. पद असो व नसो मी दिलेला शब्द विसरणारा नाही. गरज आहे तुमच्या एकसंघतेची. असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री अनंतराव गीते यांनी उपस्थित समाज बांधवांना केले. रविवार दि. 23 जून सकाळी 9.30 वाजता कुणबी भूमिपुत्र (पाक्षिक) 19 वा वर्धापनदिन सोहळा, राजे शिवाजी मंदिर, दादर (प), मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांनी आपले मनोगत मांडले.
समाजाच्या उन्नतीसाठी गेली ९९ वर्ष कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई कार्यरत आहे. संघाच्या माध्यमातून कुणबी भूमिपुत्र हे पाक्षिक गेली १९ वर्ष सातत्याने प्रकाशित होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूमिपुत्राचे सहसंपादक सुरेंद्र गावडे, कृष्णा सुर्वे, यशवंत शिंदे तसेच संघ सहसचिव भास्कर चव्हाण, हरीश्चंद पाटील, गणेश मौले, अशोक करंजे यांनी मोलाचे योगदान दिले. यानिमित विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
कुणबी समाजोन्नती संघ प्रकाशित कुणबी समाजाचे स्वत:चे हक्काचे, विचारपीठ म्हणजेच “पाक्षिक कुणबी भूमिपुत्र” याचा १९ वा वर्धापनदिन साजरा साजरा करण्यात आला. यानिमित्त संजय खापरे प्रमुख भूमिका असलेल एक विनोदी नाटक “गलती से मिष्टेक” सादर करण्यात आले. या सोहळ्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलुगुरू डॉ. अरुण सावंत, संघाचे अध्यक्ष भूषण बरे, सरचिटणीस अरविंद डाफळे, उपाध्यक्ष सदानंद काष्टे, तुकाराम लाड, हरिश्चंद्र म्हातले, माजी अध्यक्ष राम शिगवण, राजाभाऊ कातकर, राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक, कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे, महिला मंडळ अध्यक्षा आशाताई मसुरकर, नगरसेविका सुवर्णाताई करंजे तसेच तालुका शाखा पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.