रत्नागिरी : जो राजकीय पक्ष येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कुंभार समाजाला 1 लोकसभा आणि 5 विधानसभेच्या जागा देईल त्याच पक्षाच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका कुंभार समाज महासंघाने घेतली आहे. तसेच कुंभार समाजाला एनटीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. यासाठी आगामी काळात आंदोलन उभारण्यात येणार असून कोणत्याही राजकीय पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ अध्यक्ष संजय गाते यांनी चिपळूणमध्ये कुंभार समाजाच्या जाहीर मेळाव्यात दिला..
रत्नागिरी जिल्हा कुंभार समाजाचा जाहीर मेळावा चिपळूण इथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे राज्यभरातील पदाधिकारी यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास आठ हजाराहून अधिक समाज बांधव उपस्थित होते.
या मेळाव्यात महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय गाते यांनी राजकीय पक्षांना इशारा दिलेला आहे.70 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने आम्हाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेली नाही. कुंभार समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात 60 ते 70 लाख आहे. जवळपास 15 ते 20 लाख मतदार कुंभार समाजाचे आहेत. त्यामुळे आम्हाला कोणी गृहीत धरू नये. आणि म्हणूनच येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष कुंभार समाजाला 1 लोकसभा आणि 5 विधानसभेच्या जागा देईल त्याच पक्षाच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका कुंभार समाज महासंघाने घेतली असल्याचं महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ अध्यक्ष संजय गाते यांनी यावेळी या मेळाव्यात सांगितलं. तसेच गेली 25 वर्षे कुंभार समाजाला एनटीमध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी होत आहे, मात्र त्याकडे दूर्लक्ष केलं जात त्यामुळे आता अरक्षणासाठी कुंभार समाज पुढची लढाई लढणार असल्याचंही गाते यांनी यावेळी सांगितलं.