मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या संकल्पनेतून, कौशल्य सेतू अभियानांतर्गत प्रशिक्षित विद्यार्थीनींच्या, कौशल्य गुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी, कौशल्य सेतू अभियान व आदीजी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या उद्योग केंद्राचे उद्घाटन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज झाले. मंत्रालयाशेजारील टपाल कार्यालयाजवळ हे उद्योग केंद्र सुरु करण्यात आले आहे.शालेय शिक्षण मंत्री तावडे विद्यार्थींनीना यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थीनींच्या कौशल्य गुणांना वाव मिळावा तसेच त्या स्वावलंबी व्हाव्यात, त्यांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने हे उद्योग केंद्र सुरु करण्यात आले आहे.कौशल्य सेतू या अभियानात विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविले जातात. त्यातून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थीनींसाठी उद्योग केंद्र हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. या कार्यक्रमासाठी एनवायसीएस आदीजी या बहुउद्देशीय संस्थेचे जनरल मॅनेजर विवेक सुर्वे, आदीजी बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका प्रणिता पगारे, कौशल्य सेतू अभियानांतर्गत प्रशिक्षित विद्यार्थीनी उपस्थित होत्या.