
रत्नागिरी : रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळाचा 11 वा वर्धापनदिन साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात रविवारी (दि. 14 ऑक्टोबर) उत्साहात संपन्न झाला. माता तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईतील निर्माण ग्रुपचे सर्वेसर्वा आणि नामवंत बांधकाम व्यावसायिक, मराठा बिझनेस फोरमचे प्रमुख राजेंद्र सावंत, क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, कार्याध्यक्ष दिवाकर साळवी, सल्लागार सतीश साळवी आणि नंदकुमार साळवी उपस्थित होते.
मराठा समाजाची मुलुखमैदान तोफ व उद्योजक राजेंद्र सावंत म्हणाले की, क्षत्रिय मराठा मंडळाचे काम मला भावले. ज्येष्ठांचा सत्कार आपण येथे केला. आईला व मातीला व जातीला विसरतो त्याला मराठा म्हणता येणार नाही. आपण छत्रपतींचे वंशज, छातीला माती लावून लढणारे, जिजाऊंचे संस्कार असलेले लढवय्ये आहोत. आज मराठ्यांना आरक्षणाची भीक का मागावी लागते, ही नामुष्की का आली. 60 वर्षात ही स्थिती का आली, माझ्या बहिणीला का प्रवेश मिळत नाही. मी आरक्षणाच्या विरोधात नाही पण मनगटाच्या जोरावर आपण जेते आहोत. आज मराठा मंडळींच्या मोठ्या शिक्षणसंस्था, बँका आहेत. आज छत्रपती असते तर त्यांनी आरक्षण मागितले असते का?
सावंत पुढे म्हणाले की, राज्य कोण चालवतो, राज्यकर्ता कोण आहे तर तो टाटा, अडाणी, अंबानी आहे. त्यांना पाहिजे तो भूखंड, सुविधा मिळतात. मग अशा स्थितीत मराठा समाज मोठा करायचा असेल तर संघटित झाले पाहिजे. मुंबईत हॉटेल शेट्टी लोकांची आहेत, मोठी शोरूम कच्छी लोकांची व सर्व व्यापार जैन लोकांच्या ताब्यात आहे. मराठ्यांचे का नाहीत? मराठ्यांनी हे ध्यानात घ्यावे व आपल्या माणसांना मोठे करावे. कोट्यधीशांना आरक्षण मागावे लागत नाही. मग आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एका हातात तलवार व दुसर्या हातात तराजू म्हणजे व्यापारी झाले पाहिजे. आयपीएस, आयएएस अशा मोठ्या नोकर्या मिळवण्यासाठी आम्ही मराठा बिझनेस फोरमतर्फे मराठा विद्यार्थ्यांना मदत करतो. मराठा समाज घडला पाहिजे. पालकांनी मुलाला सांगावे की मी तुला 24 वर्षे सांभाळेन, त्यांनतर सांभाळू नका. शिक्षणानंतर मुलांना उमेदवारी करायला सांगा, धंदा शिकून घ्या, पडलात तरी हरकत नाही, मराठा घरातील एक मुलगा उद्योजक व्हायला हवा. महाराष्ट्रात विविध भागांत मराठा बिझनेस फोरम कार्यरत आहे. सर्व मराठ्यांनी मराठा व मराठी माणसाकडेच खरेदी करा. माझा जावई उद्योजक पाहिजे, असं म्हटले पाहिजे.
प्राची शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये मराठा महिला बिझनेस फोरम स्थापन केल्याची माहिती दिली. यात 40 महिला उद्योजिका व 250 महिला सहभागी आहेत. मराठा मंडळाच्या विकासासाठी सांस्कृतिक, शैक्षणिक आदी विविध समिती नेमल्या आहेत. यासाठी स्वतः महिला करत आहोत. आपण संघटित झालो तर काही चांगले करू शकतो.
या वेळी क्षत्रिय मराठा मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन सावंत यांच्या हस्ते केले. स्मरणिकेच्या संपादिका रश्मी घाग यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात मराठा समाजातील 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा आणि पाचवी, आठवी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी आणि उल्लेखनीय कार्य करणार्या मराठा समाजातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन सौ. मनाली राणे आणि गौरी शिंदे यांनी केले. दिवाकर साळवी यांनी आभार मानले.
मराठा समाजाचे नेते उल्हासराव घोसाळकर म्हणाले की, मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारची मानसिकता दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत मी अनेक मुद्दे मांडले. सर्व राजकीय नेत्यांची आरक्षणासाठी मानसिकता व पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारने तत्वतः आरक्षण द्यावे व अधिसूचनेसाठी अडीच महिन्यांची मुदत द्यावी. समितीपेक्षा सरकार मोठे आहे. युवकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही या सभेनंतर करण्यात आले. आरक्षण मिळाले नाही तर कर्तबगारीने एकत्र येऊन आपण संघटनशक्ती दाखवली पाहिजे. क्षत्रिय मराठा मंडळसुद्धा मजबुतीने उभे राहिले पाहिजे याकरिता समाजातील ज्येष्ठ, नामवंत मंडळीनाही सोबत घ्यावे.
सुरेशराव सुर्वे म्हणाले की, रत्नागिरीत श्री तुळजाभवानीचे मंदिर उभारण्यासाठी मंडळाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रथम मराठा मागासलेला समाज आहे, हे दाखवावे लागेल. त्यानंतर आरक्षण मिळेल. मराठा व मागास हे दोन शब्द एकत्र यावेत का? मराठे मूकमोर्चाने जगात आदर्श निर्माण केला. आरक्षण हा विषय क्लिष्ट आहे. घटनेत बदल केल्याशिवाय ते मिळणार नाही, सहजासहजी मिळणार नाही पण मराठा समाजाला एकत्र येऊन ताकद दाखवावी लागेल.